अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहे. पंजाबचे खासदार संजीव अरोरा यांनी सोशल मीडियावर दोघांचेही अभिनंदन केले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला.
यानंतर पंजाबचा गायक हार्डी संधूने चोप्राचे अभिनंदन करत या बातमीवर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी परिणीतीचे वडील पवन चोप्रा यांचे वक्तव्यही समोर आले आहे. पवन चोप्रा म्हणाले की, परिणीतीच्या नात्याची घाई करू नका. लवकरच या संदर्भातील माहिती अधिकृतपणे प्रसारमाध्यमांसोबत शेअर केली जाईल. या नात्याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तसेच परिणीतीच्या घरी तिच्या आईनेही काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, परिणीतीचे कुटुंबीय लवकरच या प्रकरणाबाबत नवीन माहिती शेअर करणार आहेत.
परिणीती ही अंबालाची राहणारी आहे
परिणीती चोप्रा ही अंबाला येथील रहिवासी आहे. तिचे शिक्षणही अंबाला येथूनच झाले. तिचे वडील पवन चोप्रा आणि आई अंबाला कॅन्टमध्ये घरी राहतात. परिणीतीच्या वडिलांचे राय मार्केटमध्ये दुकान आहे.
गायक हार्डी संधूने सांगितले की, मी परिणीतीला फोन करून तिचे अभिनंदन केले होते. एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत संधू म्हणाले की, मला खूप आनंद होत आहे की हे घडत आहे. माझ्या शुभेच्छा तिच्यासोबत आहेत. संधू आणि चोप्रा यांनी 2022 मध्ये कोड नेम: तिरंगा या चित्रपटात काम केले होते. गायकाने सांगितले की, शूटिंगदरम्यान परिणीती म्हणायची की, मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा मला योग्य व्यक्ती सापडेल.
काही काळापासून अटकळ होती
सूत्रांनुसार, दोघेही काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि दोघेही त्यांच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहेत. काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा डिझायनर मनीष मल्होत्राच्या मुंबईतील निवासस्थानी दिसली होती, त्यानंतर अभिनेत्रीच्या लग्नाच्या अटकळांना वेग आला होता. यापूर्वी विमानतळावर राघव चढ्ढा यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारल्यावर परिणीती हसली होती, त्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते.