मुंबई- सौंदर्यवती अंकिता शौरीची निवड 'रईस' चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या जागी करण्यात आली आहे. प्रदर्शनाच्यावेळी पुन्हा गोंधळ होऊन बॉक्स ऑफिसवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी माहिराला चित्रपटातून आऊट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याजागी अंकिता शौरी आपल्याला काम करताना दिसणार आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिराची निवड करण्यापूर्वी अंकिताची या भूमिकेसाठी स्क्रिन टेस्ट घेण्यात आली होती. मात्र अखेरीस निवड मात्र माहिराची झाली होती.
याविषयी बोलताना अंकिता म्हणाली, " या भूमिकेसाठी मी लूक टेस्ट दिली होती. ही एका पाकिस्तानी मुस्लिम मुलीची भूमिका आहे. दिग्दर्शकांना योग्य चेहऱ्याची गरज होती. मी यासाठी सहा महिने वाट पाहिली. पण शेवटच्या क्षणी यात बदल झाला."
माहिराची निवड झाल्यानंतर याबद्दल अंकिताला वाईट वाटले नव्हते.
ती म्हणाली, " एक मानवी अपेक्षा म्हणून मला थोडे कठीण गेले. पण, प्रत्येक गोष्टी मागे एक कारण असते असे माझे म्हणणे आहे. शाहरुखसोबत काम करण्याची संधी मी गमवली होती. माहिरा एक चांगली अभिनेत्री आहे, तिने चांगले काम केले असावे असे मला वाटते."
अंकिता शौरी आता 'रईस'मध्ये माहिराच्या जागी झळकणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचीही यात महत्वाची भूमिका आहे. 'रईस' २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.