बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. अशा परिस्थितीत पती राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टी यांनी मौन सोडून या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासाठी शिल्पा शेट्टी यांनी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेल्या शिल्पा शेट्टी यांनी राज कुंद्राच्या अटकेनंतर या प्लॅटफॉर्मपासून अंतर ठेवले होते.
तिने गुरुवारी रात्री एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. ज्यात तिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये जेम्स थर्बर या लेखकाचे एक वाक्य दिसून येत आहे. रागात मागे वळून पाहू नका किंवा घाबरुन येणाऱ्या काळाकडे पाहू नका उलट जागरुक राहून याकडे पाहा, असा या वाक्याचा अर्थ आहे.
त्यात पुढे असे लिहिले आहे की, ज्यांनी आपल्याला निराशेच्या गर्तेत ढकलले, ज्यांच्यामुळे आपल्याला दुर्देव असल्यासारखे वाटले त्या लोकांच्या भूतकाळाकडे आपण रागाने वळून पाहतो. भविष्याकडे पाहतानाही आपण माझी नोकरी जाईल, मला एखादा आजार होईल किंवा जवळच्या एका व्यक्तीचे निधन होईल या भीतीमध्ये जगत असतो. आपण सध्याच्या वर्तमानामध्ये जगायला शिकले पाहिजे. काय घडले आणि काय घडणार याबद्दल विचार करण्याऐवजी आहे त्या वास्तवात जगले पाहिजे, असा या पोस्टमधील लेखकाच्या ओळींचा अर्थ आहे. मी जिवंत असल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो आणि मोठा श्वास घेतो. मी भूतकाळामध्ये अनेक आव्हानांना तोंड दिले आहे आणि भविष्यातही देईन. माझे आजचे आयुष्य जगण्यापासून मला कोणीही विचलित करु शकत नसल्याचे या पोस्टच्या शेवटच्या ओळींमध्ये लिहिण्यात आले आहे.
शिल्पाने या पोस्टच्या माध्यमातून एकप्रकारे तिच्या मनाची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. अर्थात तिने पती राज कुंद्राला झालेल्या अटकेसंदर्भात किंवा एकंदरितच या प्रकरणासंदर्भात थेट कसलाही उल्लेख केलेला नाही. पण तिने येणारी सर्व आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत या पोस्टमधून दिेले आहेत