तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित मोदी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माता असित मोदी आणि शोशी संबंधित इतर दोन लोकांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस बराच काळ तपास करत होते. आता सोमवारी मुंबई पोलिसांनी लैंगिक छळ प्रकरणी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा निर्माता असित मोदीसह तीन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
अभिनेत्रीने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी असित मोदी तसेच ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतीन बजाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
एएनआय या वृत्तसंस्थेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, असित मोदी तसेच सोहेल आणि जतीन यांच्याविरुद्ध कलम 354 आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
गेल्या महिन्यात पवई पोलिसांनी लैंगिक छळ प्रकरणी असित मोदी आणि दोन लोकांविरुद्ध अभिनेत्रीचे जबाब नोंदवले होते. पवई पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर त्यांनी असित मोदी आणि सोहेल रमाणी यांनाही या प्रकरणी त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स पाठवले होते.
असित मोदी यांनी अभिनेत्रीने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत एक निवेदन जारी केले, "आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. ती आमची आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांचा आमच्यासोबतचा करार संपला आहे." म्हणूनच ती आमच्यावर असे बिनबुडाचे आरोप करत आहेत."
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मिसेस सोढीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्री या अभिनेत्रीने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, शोचे निर्माता असित मोदी अनेक वर्षांपासून तिचा लैंगिक छळ करत आहे. पण काम जाण्याच्या भीतीने ती अजूनही गप्पच होती.
असित मोदींनी हात जोडून माफी मागावी, असेही त्या म्हणाल्या होत्या. त्याच्याशिवाय मोनिका भदोरियानेही निर्मात्यांवर अनेक आरोप केले होते.