अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे.
'1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले,' असं वक्तव्य कंगनाने केलं. भारताचा अवमान आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे.
त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे श्रीमती कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.