आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणा-या दिग्दर्शकांमध्ये संजय लीला भन्साळींचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही वर्षांत भन्साळींच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. त्यात प्रामुख्याने देवदास, पद्मावत, बाजीराव मस्तानीचा उल्लेख करावा लागेल आणि आता भन्साळींचा हीरामंडी नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे.
हीरामंडी चा टीझर आता प्रदर्शित झाला असून त्याला नेटक-यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी त्याचा फर्स्ट लूक समोर आला होता. त्यावेळी त्यातील अभिनेत्री आणि त्यांचा लूक पाहून चाहते भारावून गेले होते. खासकरून मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा यांच्या लूकवर चाहते फिदा झाले होते.
प्रेम, सत्ता आणि स्वातंत्र्य यांची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणून हीरामंडीकडे पाहिले जात आहे. भन्साळी यांचे चित्रपट, त्यांची कथा, त्यांचे सादरीकरण, त्यांचे निर्मिती मूल्य, छायादिग्दर्शन आणि सेट, त्याची भव्यता हे कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यामुळे भन्साळी यांचे चित्रपट थिएटरमध्ये पाहणे हा एक वेगळा अनुभव असतो. आता आगामी काळात त्यांच्या हीरामंडी नावाच्या चित्रपटाचे वेध लागले आहेत.
हीरामंडी ही एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारी सीरिज असल्याचे बोलले जात आहे. त्याची चाहते ब-याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. हीरामंडी द डायमंड बाजार मधून भन्साळी हे ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या टीझरमध्ये आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा या अभिनेत्री दिसत आहेत.
Edited By - Ratnadeep ranshoor