अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील वादावर सर्वांना घेरण्याचा प्रयत्न सुरु असताना अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं. उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात होत असलेल्या फिल्मसिटीवर भूमिका मांडत म्हटले की बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून ते ड्रग्ज प्रकरणात देखील बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप केले जात आहे. अनेक कलाकारांची नावं घेतली जात असून बॉलिवूड इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे की गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे. परंतू बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत.
करोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिलं.