आपल्या आगळ्यावेगळ्या पोशाखांसाठी प्रसिद्ध असलेल्या उर्फी जावेदची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होते.आपल्या कपड्यांसाठी उर्फी प्रसिद्ध असली तरी तिने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत घेतलेला पंगाही सर्वांना चांगलाच लक्षात आहे.
मूळची लखनौची असलेली उर्फी सध्या झगमगाटाने भरलेल्या मुंबईच्या मॉडेलिंग क्षेत्रात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र आपल्या पोशाखामुळे, विधानांमुळेही ती अनेकदा वादात सापडते.
या प्रसिद्धीपर्यंत पोहोचण्यासाठी उर्फीला अतिशय संघर्षपूर्ण असा प्रवास करावा लागला आहे. कुमारवयातच उर्फीने आपलं राहतं घर सोडलं होतं. त्यानंतर दिल्लीमार्गे मुंबई गाठून उर्फीने मॉडेलिंग क्षेत्रात जम बसवला.
आज आपल्या आगळ्यावेगळ्या पोशाखांसाठी उर्फी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.
लखनौ ते मुंबई हा उर्फी जावेदचा प्रवास नेमका कसा राहिला, हे जाणून घेण्यासाठी नयनदीप रक्षित यांनी बीबीसी हिंदीसाठी उर्फीची मुलाखत घेतली.
तिघी बहिणींनी एकत्र घर सोडलं
उर्फीने मुलाखतीत सांगितलं की, तिने आणि तिच्या दोन्ही बहिणींनी एकत्रितरित्या घरातून पलायन केलं होतं. उर्फीची थोरली बहीण तिच्यापेक्षा एका वर्षाने मोठी आहे, तर धाकटी बहीण ही अडीच वर्षांनी लहान आहे.
घरातून पळून जायचं नियोजन कुणी केलं होतं या प्रश्नाचं उत्तर देताना तिने म्हटलं, "माहीत नाही. माझ्या मोठ्या बहिणीला याचं उत्तर विचारलं तर ती म्हणते तिने हे प्लॅनिंग केलं. मला विचारलं तर मी म्हणते मी प्लॅनिंग केलं. आम्ही आजही यावरून एकमेकांना चिडवतो."
जिवंत राहण्यासाठी घरातून पळाले
ती पुढे सांगते, “माझं मॉडेलिंग-अभिनय असं स्वप्न वगैरे असं काहीही नव्हतं. पण मला माझ्या मनानुसार घरात जगू दिलं जात नव्हतं. घरातलं वातावरण खूपच वाईट बनलं होतं. मी घरात राहिले असते तर मरून गेले असते.”
“माझे वडील मला खूप मारायचे, घाण-घाण शिव्या द्यायच्या. माझा आणि माझ्या बहिणींचा खूप मानसिक छळ करण्यात आला. माझे वडील खूपच टॉक्झिक होते. सतत आम्हाला त्रास द्यायचे. मी खरं तर जिवंत राहण्यासाठी घरातून पळाले.”
उर्फी लहानपणापासूनच अशी बिनधास्त होती की परिस्थितीने तिला असं बिनधास्त बनवलं?
या प्रश्नाचं उत्तर देताना उर्फी म्हणते, “मला लहानपणापासूनच असे कपडे वापरण्याची आवड होती. पण घरात मला ते करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. त्यामुळे मग वरून जॅकेट घालून घरातून बाहेर पडायचं. मग नंतर जॅकेट काढून मोकळेपणाने फिरायचं, असं मी करायचे.”
आपल्या कुटुंबाने आपली साथ दिली तर तुझं बालपण वेगळं राहिलं असतं, असं वाटतं का? या प्रश्नावर ती म्हणाली, “हो, कधीकधी वाटतं, पण विशेष असं काही नाही. उलट मी इथवर आले, म्हणजे मी नशीबवान आहे, असंच मला वाटतं. कदाचित मला माझ्या वयाच्या तुलनेत जास्त अनुभव मिळाला.
काही दुःखी क्षण नक्कीच येतात. इतरांचे वडील त्यांच्या मुलांवर प्रेम करताना पाहून, आपले वडील असे का नव्हते, असं कधीकधी नक्कीच वाटतं. पण त्याचं आता विशेष काही वाटत नाही.”
मुलांची ट्यूशन घेऊन पैसा मिळवला
उर्फीने लखनौ ते मुंबई व्हाया दिल्ली या प्रवासाबाबत बीबीसीला सांगितलं.
ती म्हणते, "घरातून बाहेर पडले तेव्हा हातात एकही पैसा नव्हता. पण आमचं जगणं थांबलं नाही. पण लखनौमध्ये सुरुवातीला आम्ही ट्यूशन घेऊन पैसे कमावले."
"बाकी दोन वेळचं जेवण कुणीही देतं. आजकाल भुकेने कुणीच मरत नाही. पैशाचं काय, पैसे कितीही मिळाले तरी ते आपल्याला कमीच वाटतात."
"सहा महिने लखनौमध्ये राहिले. मग दिल्लीला गेले. तिथे कॉल सेंटरमध्ये काम केलं. दिल्लीत 7-8 महिने काम केलं. त्यानंतर मुंबईला आले. तेव्हा कदाचित मी 19 वर्षांची होते."
मुंबईत मनासारखं जगले
“मुंबईत आले तेव्हा मी एकटीच आले होते. पण येथील परिस्थितीने मला आत्मविश्वास दिला. जिथं तुमचं कुणी नसतं, आपलं आपल्याला करायचं असतं. मग आपल्यालाच करायचं असेल, तर मग आपण आपल्या पद्धतीनेच ते करायला हवं, असं मला वाटतं.”
"मुंबईत मला कधीच एकटेपणा बिलकुल जाणवला नाही. मी तो जाणवूही दिला नाही. मी स्वतःमध्येच मश्गुल असायचे. टिंडर-बंबलवरून डेट करायचे. मजामस्ती करायचे. माझ्यासाठी तर ते घरापेक्षा चांगलंच होतं. मुंबईत मला हवं असलेलं स्वातंत्र्य मिळालं.”
“घरी असताना मला घराबाहेरही पडायचं मुश्कील होतं. पण इथे मुंबईत मी दारू पित होते, पार्टी करत होते, डेट करत होते. जे माझ्या मनात होतं, ते सगळं मी मुंबईत करत होते. मी ते क्षण एंजॉय केले. मस्त फिरायचे, मजा करायचे.”
"मुंबईत आल्यानंतर मी टीव्हीमध्ये ऑडिशन देणं सुरू केलं. तीन-चार महिन्यांत मला काम मिळू लागलं. मला ते बरं वाटलं. पैसेही चांगले मिळायचे. त्यामुळे कामापेक्षा ते मला छानच वाटलं. एक रिस्क अशी होती की सहा महिने काम मिळायचं, सहा महिने मिळायचं नाही. पण तेही मी चालवून घेतलं. कारण सहा महिन्यात मिळवलेले पैसे मला वर्षभर पुरायचे."
उर्फी म्हणते, "मी हिरोईन आहे, असं मला लहानपणापासूनच वाटत होतं. पण घरातून बाहेर पडलेच आहे, तर हेसुद्धा करून पाहावं, असं मला वाटलं. पण माझा अभिनय वाईट आहे.”
शस्त्रक्रिया करून चेहरा बदलला
उर्फी जावेदने आपल्या चेहऱ्यावर केलेल्या शस्त्रक्रियेबाबतही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
ती म्हणाली, “मी मुंबईत आले तेव्हा माझ्यात खूप आत्मविश्वास होता. पण मी स्वतःला स्क्रिनवर पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे दात पुढे आहेत. माझा चेहराही आकर्षक नसल्याचं मला वाटू लागलं. तेव्हा मी इन्स्टाग्रॅमवर एका अभिनेत्रीला सौंदर्य शस्त्रक्रिया केल्याचं पाहिलं. मला ते पाहून छान वाटलं. पण माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून मी ती शस्त्रक्रिया करून चेहरा मनासारखा करून घेतला.”
“एका शस्त्रक्रियेत डॉक्टरने माझा चेहरा बिघडवला होता. त्यांनी माझे ओठ वाकडे करून टाकले होते. पण मी पुन्हा मी नीट करून घेतलं.”
लेस्बियन-इंटिमेट दृश्यावरून निर्मात्याला तुरुंगात पाठवलं
मनोरंजन क्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न करत असताना काही प्रमाणात शोषणाचा सामना करावा लागल्याचं उर्फीने सांगितलं.
उर्फीला एका वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी देऊन एका निर्मात्याने तिचा छळ करण्याचा प्रयत्न केल्याचंही ती सांगते.
आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत ती म्हणाली, “सुरुवातीपासूनच मी इंटिमेट सीन देणार नाही, याबाबत ठाम होते. पण एका वेब सिरीजसाठी मला लीड रोलसाठी निवडण्यात आलं होतं. सिरीजमध्ये इंटिमेट सीन करायचे नाहीत, असं मी त्यांना आधीच सांगितलं होतं. पण ते फक्त सूचक स्वरुपात असतील, असं त्यांनी मला कळवलं. मी सेटवर पोहोचताच त्यांनी मला लेस्बियन सीन करायला लावला. तसंच आणखी इंटिमेट सीन त्यांनी माझ्याकडून करवून घेतले.
“मी याबाबत निर्मात्यांकडे तक्रार केली. पण त्यांनी माझं काहीएक ऐकलं नाही. सेटवर जबरदस्तीने माझे कपडे फाडण्यात आले. कपडे काढ म्हणून मला धमकावण्यात आलं. मला ते माझं शोषण वाटलं. तीन दिवसांनंतर मी पोलिसांत गेले. यानंतर ते तुरुंगात गेले. नंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर खूप दबाव टाकण्यात आला. अखेर, मी ती तक्रार मागे घेतली."
वेगळं करणाऱ्याचा नेहमीच विरोध
उर्फी जावेद आपल्या कपड्यांवरून नेहमी चर्चेत असते. तिचा पोशाख अनेक वेळा वादग्रस्तही ठरलेला आहे.
याचं स्पष्टीकरण देताना ती म्हणते, “एखादा व्यक्ती सामाजिक संकेतांपेक्षा वेगळं काही करत असल्यास सुरुवातीला त्याचा विरोध होतोच. राजीव गांधींनी पहिल्यांदा भारतात कॉम्प्युटर आणला तेव्हा त्यांचे पुतळे जाळले गेले होते. पण आज आपल्या प्रत्येकाच्या हातात कॉम्प्युटर आहे.”
“कपड्यांवरून मला लेबल लावण्यात येतात. रोज कुणीतरी उठतो. इंटरनेटवर माझ्याबद्दल काहीही बोलतो. पण तो व्यक्ती त्याच्या जीवनात काय करत आहे, ते त्याने स्वतः पाहावं.
Published By- Priya Dixit