इन्स्टा क्वीन रिअॅलिटी टीव्ही स्टार उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असते. आता ही ती चर्चेत आलीय, एका कमेंटमुळे. लेखक चेतन भगतने केलेल्या एका कमेंटवरून उर्फी जावेद आणि चेतन भगत मध्ये वाद रंगलाय. एका कार्यक्रमात बोलताना चेतन भगत म्हणाला होता की, 'उर्फी जावेदचे कपडे तरुणांचं लक्ष विचलित करतायत.'
त्याच्या या कमेंटनंतर वाद वाढायला लागला. यावर चेतन भगत पुन्हा म्हणतो की, "मी तरुणांना फक्त त्यांच्या करिअरवर लक्ष द्यायला सांगितलं. इन्स्टाग्रामवर त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये."
ट्विटरवर रिप्लाय करताना चेतन भगत म्हणतो की, "माझ्या वाक्यांचा संदर्भ काढून टाकलाय, मी जे म्हटलं होतं त्यात काटछाट करण्यात आली आहे, आणि जे मी कधी बोललोच नाही ते दाखवण्यात आलंय."
एका साहित्य संमेलनात बोलताना चेतन भगत म्हटला होता की, "मोबाइलमुळे तरुणांचं लक्ष विचलित होतंय, ते तासनतास इन्स्टाग्रामवर रिल्स बघत बसतात."
भगत पुढे म्हणतो की, "हा उर्फी जावेदचा फोटो आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांना हे माहिती आहे का? हा फोटो कोणत्या कोर्समध्ये शिकवला जाणार आहे का? यातून तुमची प्रगती होणार आहे का? जॉब इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणणार आहात का, की तिचे सर्व ड्रेसेस मला माहित आहेत. यात तिचा काही दोष नाहीये, ती तिचं करिअर बनवते आहे. अशा अजून पन्नास आहेत."
चेतन भगतच्या या कमेंटवर उर्फी जावेद म्हणते की, "त्या साहित्य संमेलनात माझं नाव घेणं गरजेचं होतं का? मी लेखक नाहीये, आणि या सगळ्यांशी माझं काहीच देणंघेणं नाहीये."
चेतन भगतवर व्यक्तिगत निशाणा...
उर्फी जावेदनेही चेतन भगतवर आता व्यक्तिगत कमेंट केली आहे.
उर्फी जावेद म्हणते, "तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माझ्यामुळे तरुणाई बिघडते आहे, ते लपून छपून माझे फोटो बघतात. तरुणांचं सोडा, तुम्ही तरी मोठे आहात, कदाचित माझ्या काकांच्या वयाचे असाल, तरुणांच्या वडिलांच्या वयाचे असाल, आणि तुमचं लग्नही झालंय. पण तरीही तुम्ही तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलींना मॅसेज करता? तेव्हा तरी काहीच खराब वाटत नाही तुम्हाला, ना तुमचं लग्न बिघडलंय, ना तुमची मुलं बिघडली."
उर्फी जावेदने लीक झालेल्या एका व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या चॅटमध्ये चेतन भगत एका मुलीशी बोलतोय असं दिसतंय.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम रीलमध्ये लिहिलंय की, "असे पुरुष स्वतःमध्ये असलेले दोष स्वीकारत नाहीत, उलट महिलांना दोष देत बसतात. जर विकृती तुमच्यातच असेल तर महिलेने कोणते कपडे घातलेत याने काहीच फरक पडत नाही."
उर्फी पुढे लिहिते की, "तुम्ही म्हणताय की, माझ्या कापड्यांमुळे तरुणांचं लक्ष विचलित होतंय. पण तुम्ही ज्या पद्धतीने मुलींना मॅसेज करताय त्याने लक्ष विचलित होत नाहीये का?"
चेतन भगतने दिलं प्रत्युत्तर
उर्फीने केलेल्या आरोपांवर चेतन भगत म्हणतो की, त्याने अशापद्धतीने कोणत्याही मुलीशी चॅट केलेलं नाही. आणि तो या मुलीला ओळखत सुद्धा नाही.
चेतन भगत ट्वीट करतो की, "ना मी अशा कोणत्याही मुलीला ओळखतो, ना मी असं कधी कोणत्या मुलीशी चॅट केलंय, ना मी असं कधी बोललोय. हे जे पसरवलं जातंय ते फेक आहे, खोटं आहे. आणि मूळ मुद्दा म्हणजे मी कोणावर टीका सुद्धा केलेली नाहीये."
तो पुढे लिहितो की, "मला वाटतं की, इन्स्टाग्रामवर वेळ वाया घालवू नका, फिटनेस आणि करिअरवर लक्ष केंद्रित करा, असं सांगणं अजिबात चुकीचं नाहीये."
कोण आहे उर्फी जावेद?
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे.
उर्फीला इंस्टाग्रामवर जवळपास 10 लाख लोक फॉलो करतात. आणि तिच्या रिल्सला आणि व्हिडिओंना लाखोंच्या घरात व्ह्यूज असतात.
उर्फी बऱ्याचदा मुंबईत पॅपराजींसाठी पोज देताना दिसते.
उर्फी बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. आता ती स्पिट्सविलात सहभागी होणार आहे.
चेतन भगत आणि त्याच्याशी संबंधित वाद
लेखक चेतन भगत अनेकदा वादात सापडलाय.
आयआयटी दिल्लीमधून इंजिनिअरिंग आणि नंतर आयआयएम अहमदाबादमधून आपलं शिक्षण पूर्ण करणारा चेतन भगत त्याच्या पुस्तकांमुळे चर्चेत आला होता.
त्याच्या फाईव्ह पॉईंट समवन या पुस्तकावर आधारित थ्री इडियट्स हा चित्रपट आला तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
या चित्रपटात आमिर खान, आर माधवन आणि करीना कपूर यांनी काम केलंय तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलंय.
हॅलो, काई पो चे, 2 स्टेट्स आणि हाफ गर्लफ्रेंड हे चित्रपट सुद्धा चेतन भगतच्या पुस्तकांवर आधारित होते.
चेतन भगतने काही चित्रपटांसाठी स्क्रिप्ट रायटिंगही केलं.
पण एवढी लोकप्रियता मिळवूनही वादाने त्याची पाठ काही सोडली नाही.
थ्री इडियट्स हा चित्रपट हिट झाल्यानंतर, आपल्याला त्याचं क्रेडिट दिलं नसल्याचा आरोप त्याने निर्माता-दिग्दर्शकावर केला होता.
पण दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हटले होते की, त्यांनी या पुस्तकाचे राईट्स विकत घेतले आहेत.
बिहारमधील डुमरावच्या राजघराण्याने चेतन भगतवर हाफ गर्लफ्रेंडची स्टोरी चोरल्याचा आरोप केला होता. त्यांनी तसा मानहानीचा खटला सुद्धा दाखल केला होता.
देशात असहिष्णुता वाढते आहे हे कारण देऊन बऱ्याच कलाकारांनी आणि लेखकांनी त्यांचे पुरस्कार परत केले होते. चेतन भगतने यावर त्यांची खिल्ली उडवली होती. त्याच्या या ट्वीटमुळे तो वादात अडकला होता, त्याच्यावर बरीच टीकाही झाली होती.
2017 मध्येही त्याच्यावर चोरीचा आरोप झाला होता. लेखिका आणि संशोधक अन्विता बाजपेयी यांनी म्हटलं होतं की, चेतनची 'वन इंडियन गर्ल' नावाची कादंबरी त्यांच्या 'ऑड्स अँड एंड्स' पुस्तकातील शॉर्ट स्टोरीशी साधर्म्य सांगणारी आहे.
अन्विता बाजपेयी यांचं हे पुस्तक 2014 साली प्रकाशित झालं होतं. तर चेतन भगतची ही कादंबरी 2016 मध्ये प्रकाशित झाली होती
चेतन भगतवर #MeToo अंतर्गतही आरोप झाले होते.
त्याने वॅक्सिनच्या मुद्द्यावरून 2021 मध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
भारतात फायजर आणि मॉडर्ना लसी का मिळत नाहीत, असा सवाल चेतन भगतन उपस्थित केला होता.
याविषयी त्याने एकामागून एक ट्वीट करत भारत सरकारवर टीका केली होती.
चेतन भगतने ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "फायझर आणि मॉडर्ना लशी सर्वांत चांगल्या आहेत. या दोन्ही लशी 2020 पासून उपलब्ध आहेत मात्र त्या भारतात मिळत नाहीत. का? आम्ही चांगल्या गोष्टींसाठी लायक नाहीये का? आपण शस्त्रास्त्र परदेशातूनच खरेदी करतो ना? ही युद्धजन्य स्थिती नाहीये का? वॅक्सिन इथलंच हवं असा अट्टहास का?"