Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'छपाक'च्या विरोधात ज्येष्ठ लेखक राकेश भारती यांनी घेतली हायकोर्टाकडे धाव

'छपाक'च्या विरोधात ज्येष्ठ लेखक राकेश भारती यांनी घेतली हायकोर्टाकडे धाव
, सोमवार, 6 जानेवारी 2020 (12:04 IST)
मुंबई : ज्येष्ठ लेखक - फिल्मकार राकेश भारती यांनी मुंबई उच्च न्यायालयात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर चित्रपट 'छपाक' च्या मेकर्स विरोधात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकानुसार अ‍ॅसिड हल्ल्याच्या बळी पडलेल्या लक्ष्मी अग्रवाल वर आधारित चित्रपटाची मूळ कथा त्यांनी लिहली आहे. याचिकाकर्ता राकेश भारती यांची मागणी आहे की, त्यांना चित्रपटात सहलेखक म्हणून श्रेय दिले जावे.
 
राकेश भारती यांनी दाखल केलेल्या याचिकेत ते म्हणाले आहेत की, चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी कल्पना / चित्रपटाची संकल्पना आखली होती, ज्याला त्यांनी ‘ब्लॅक डे’ असे नाव दिले आणि ह्या कथेचे फेब्रुवारी  २०१५ मध्ये इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन (आयएमपीएए) मध्ये नोंदवणी देखील केली होती. राकेश भारती म्हणाले की, तेव्हापासून ते ह्या पटकथेवर काम करत होते आणि चित्रपटासाठी विविध कलाकार आणि निर्मात्यांना ह्या कथा मांडण्यात लिन होते. ह्या दरम्यान त्यांनी ही कथा फॉक्स स्टार स्टुडिओला ऐकवली होती.
 
ह्या याचिकेमध्ये त्यांनी सामायिक केले आहे, काही विशिष्ट परिस्थितीमुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. 'छपाक'ची निर्मिती करणाऱ्या कंपनी फॉक्स स्टार स्टुडियोजकडे याचिनकाकर्त्याने चित्रपटाची कल्पना सामायिक केली होती.
 
राकेश भारती यांचे वकील अशोक सरावगी म्हणाले, "याचिकाकर्ताला याबद्दल नंतर कळले कि त्याच विषयावर बचाव पक्षाकडून संबंधित फॉक्स स्टार स्टुडिओज आणि अन्य लोकांद्वारे ह्या चित्रपटाचे निर्माण होत आहे, ज्याचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत."
 
राकेश भारती यांनी निर्मात्यांच्या समोर सर्व तक्रारी मांडल्या होत्या, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकाद्वारे राकेश भारती यांची मागणी आहे कि, चित्रपटामध्ये त्यांना सह-लेखक म्हणून श्रेय देण्यात यावे असे न केल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी. तसेच या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणि मूळ कथेची तुलना 'छपाक'शी करण्यासाठी तज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
वकील अशोक सरावगी  म्हणाले की, "या याचिकेची पहिली सुनावणी हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठाने २७ डिसेंबर रोजी केली होती आणि आता याची पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी होईल."
 
'छपाक' हा अ‍ॅसिड हल्लयाच्या बळी ठरलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून यामध्ये दीपिका पादुकोण आणि विक्रांत मेस्सी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी देशभरात प्रदर्शित होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परेश रावल साकारणार माजी राष्ट्रपती कलाम यांची भूमिका