Publish Date: Tue, 28 Jul 2015 (10:07 IST)
Updated Date: Tue, 28 Jul 2015 (10:09 IST)
पीळदार शरीरयष्टीचा ‘बाहुबली’ आणि 56 इंचाची छाती असे ज्यांचे वर्णन केले जाते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडली आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाचा नायक अर्थात अभिनेता प्रभास याने पंतप्रधानांची भेट घेत त्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली. ‘बाहुबली’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कमाईचे विक्रम रचत आहे.
काहीच दिवसांपूर्वी प्रभासने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजनाथ यांनी चित्रपट पाहण्याची इच्छा असल्याचं ट्विटरद्वारे म्हटलं होतं. आतापर्यंत दक्षिण भारतातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्रिमहोदयांनी बाहुबली पाहिला आहे.
बाहुबली चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर विविध रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. फक्त भारतच नाही तर जगभरातील प्रेक्षकांनी गौरवलेला, दिग्दर्शक राजमौली यांच्या तीन वर्षाच्या कष्टाचं फळ असलेल्या चित्रपटाने आतापर्यंत 400 कोटींचा पल्ला गाठला आहे.