Publish Date: Fri, 18 Sep 2015 (11:28 IST)
Updated Date: Fri, 18 Sep 2015 (11:49 IST)
दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सुपरहिट गंगाजल चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जय गंगाजल’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘गंगाजल’ चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. खाकी वर्दीतील अजय देवगणने बिहारच्या राजकारणाचा समाचार यातून घेतला होता. त्यानंतर पुन्हा उत्तर भारतातील एका
कथानकासह झा ‘जय गंगाजल’ घेऊन आले आहेत. प्रियांका या चित्रपटात एसपी आभा माथुरच्या भूमिकेत दिसणार आहे. नक्षली भागात तिची हुकमत फारशी चालणार नाही, या अपेक्षेने तिची बदली केली जाते. मात्र यावर
आभा माथुर काय करते, हे चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
गंगाजलमध्ये अजयसोबत नाना पाटेकर आणि ग्रेसी सिंग होते, तर जय गंगाजलमध्ये प्रियांकाच्या जोडीला मानव कौल, राहुल भट, मुरली शर्मा आणि निनाद कामत दिसणार आहेत. जय गंगाजलच्या दिग्दर्शनासोबत
लेखनाची जबाबदारीही प्रकाश झा यांनीच सांभाळली आहे. 4 मार्च 2016 रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.