'कुर्बान'मधील 'बॅकलेस' प्रसंग अश्लील नाही- करीना कपूर
, गुरूवार, 12 नोव्हेंबर 2009 (11:28 IST)
कुर्बानमधील उघड्या पाठीच्या (बॅकलेस) त्या प्रसंगात काहीही अश्लील नाहीये. प्रसिद्धीसाठी त्या प्रसंगाचे पोस्टर बनविण्यात आले असले तरी त्यातून चित्रपटाची थीमच जाहीर करण्यात आली आहे, असा दावा करीना कपूरने केला आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान दोघांचा नग्न अधोभाग या पोस्टरवर दाखविण्यात आला आहे. यात सैफच्या छातीवर जखम असल्याचे दिसते. 'यातूनच चित्रपटाची थीम स्पष्ट होते,' असे सांगून प्रेम, त्याची तीव्रता आणि हिंसाचार या तिन्हीचे मिश्रण या चित्रपटात आहे. या तिन्ही बाबी एकत्रित दाखविण्यासाठी यापेक्षा चांगले पोस्टर कसे बनविता आले असते? असा सवाल तिने केला. या चित्रपटात अश्लील असे काही नाही. करण जोहरसारखा निर्माता आणि रेन्सिल डिसिल्वासारखा दिग्दर्शक पाहिल्यानंतर त्यांच्याकडून अश्लीलतेची अपेक्षा आपण करू शकत नाही, असेही ती म्हणाली. जब वुई मेटमधील गीतनंतर कुर्बानमधील अवंतिका या आपल्या भूमिकेची लोकांना दखल घ्यावी लागेल, असे करीनाला वाटते. ती म्हणाली, की कुर्बानमधील अवंतिकेच्या भूमिकेला खूप महत्त्व आहे. चित्रपट उलगडत जातो तसे तिच्या भूमिकेला असलेले कंगोरे स्पष्ट होत जातात. केवळ सरधोपट प्रेमकथेत अडकलेला हा चित्रपट नाही. यातील प्रत्येक भूमिकेला अनेक पापुद्रे आहेत. अवंतिकाही त्याला अपवाद नाही.'करीनाने यात एका प्राध्यापिकेची भूमिका साकारली आहे. ही प्राध्यापिका तिच्या एका सहकार्याशी लग्न करून अमेरिकेत जाते. पण त्यानंतर तिचे आयुष्य एका वेगळ्याच आवर्तात सापडते. ही कथा खरं तर अवंतिकेचीच आहे. पूर्ण पडद्यावर तिचाच प्रभाव जाणवत राहिल. लोक अवंतिकासोबत रडतीलही असा विश्वास करीनाने व्यक्त केला. जब वुई मेटनंतर तिचे मै और मिसेस खन्ना, कम्बख्त इश्क, टशन, गोलमाल रिटर्न्स हे चित्रपट रिलीज झाले. पण त्यातल्या गोलमाल रिटर्न्सवगळता इतर चित्रपटांना अपयश पहावे लागले. त्यामुळेच करीनाला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.