विद्यार्थी, तरुणांच्या बळावर देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणारे मिसाईलमॅन तथा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून जयसिंगपूर येथील सर्वात जुनी नावाजलेली इंग्रजी माध्यमाची शाळा ‘जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कूल’ येथे साजरा केला जात आहे. मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०१६ या दिवशी डॉ. कलाम लिखित पुस्तकांसह इतर प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करून त्यांना अनोखी सलामी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे एकमेकांना पुस्तक भेट देऊन डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्ट्याचे उद् घाटन होत आहे. भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या अद्वितीय संशोधनामुळे देशाला वेगळी ओळख मिळाली. त्यांचे लिखाण तरुणांसाठी प्रेरणादायी राहिले आहे. येणार्या काळात त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने त्यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जात आहे. या दिवसापासून विद्यार्थी, तसेच समाज वाचन संस्कृतीकडे अधिकाधिक कसा आकर्षित होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केवळ विद्यार्थीच नव्हेत; तर शाळांपासून कॉर्पोरेट कार्यालयांमध्येदेखील वाचनासाठीचा कोपरा असावा. पुस्तकं ही आत्मभान आणि आत्मशोध यासाठी उपयोगी ठरू शकतात म्हणजेच आरशाचं काम ती करतात. वाचनसंस्कृती, संवर्धन करणा-या संस्था भरपूर आहेत. त्यांनाही पाठबळ मिळावं असाही उद्देश यामागं आहे. वाचनाची आवड निर्माण करणं हा काही एका दिवसाचा उपक्रम असू शकत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक, सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. सतत मोबाईल गेम किंवा व्हॉट्सअॅपमुळं मुलांना विचार करण्यासाठी अवांतर वेळ मिळत नाही; त्यामुळं वाचनाशी त्यांना जोडून घ्यायला अडचण निर्माण होते. यासाठी मुलांनी सतत विविध विषयावरील पुस्तकांचं वाचन करावं. तसंच कुणालाही भेट देताना जाणीवपूर्वक पुस्तकांचीच भेट दिली जावी. ज्ञानसंपन्न आणि माहितीसमृद्ध समाज घडण्यासाठी वाचनसंस्कृतीचा विकास व प्रसार आवश्यक आहे; तसंच व्यक्तिमत्त्वविकास आणि भाषाविकास यासाठीही वाचनाची अत्यंत आवश्यकता असते.
कोणत्याही थोर व्यक्तिमत्त्वाचे चरित्र वाचले, तर त्यांच्या जडणघडणीत आई; तसंच शिक्षकांबरोबर वाचलेली पुस्तकं हा महत्त्वाचा घटक असतो. गरिबीवर मात करून शिक्षणाचे पंख घेऊन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भरारी घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं आणि त्यांच्या पुस्तकांनी आमच्यासारख्या कितीतरी जणांना प्रेरणा दिली आहे. वाचनाचा हा सुखद अनुभव आणि चांगला संस्कार विद्यार्थिदशेतच विद्यार्थ्यांवर व्हावा यासाठी कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्यावतीने एकदिवशीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर लेखक प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य आणि समीक्षक मंगेश विठ्ठल कोळी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. ग्रंथप्रदर्शनात विविध विषयावरील पुस्तकांचा समावेश करण्यात आला असून ही पुस्तके मुलांनी खरेदी करावी व ती वाचावी म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला प्रोत्साहन द्यावे. मुलांच्या वाचन संस्कृतीस सर्व सुजाण पालकांनी हातभार लावल्यास भावी पिढी उज्ज्वल भारत घडविण्यास सक्षम होईल. पालकांनी सहकुटुंब ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी व त्याचा आनंद लुटावा असे आवाहन मुख्याध्यापक - जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी केले असून; विद्यार्थी - शिक्षक - कर्मचारी वृंद यांचेकडून वाचन प्रेरणा दिनाच्या सर्व विद्यार्थी - शिक्षक - पालक यांना हार्दिक शुभेच्छा!
• श्री. विजयराज मगदूम, चेअरमन - डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट, जयसिंगपूर
• श्री. बादशाह जमादार, मुख्याध्यापक - जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कूल, जयसिंगपूर
डॉ. सुनील दादा पाटील, प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर