Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुस्तक परिचय : पैंजण

पुस्तक परिचय : पैंजण
, सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (11:38 IST)
सौ राधिका भांडारकर यांचे पैंजण हे एकूण ३५ लेखांचे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. या आधीही त्यांचे लव्हाळी आणि ग मभ न हे दोन लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत.पुस्तकाची पृष्ठसंख्या केवळ ११३ असल्याने सर्व लेख सहज एका बैठकीत वाचता येतात.
 
मुखपृष्ठ पाहताच पैंजणांची नादमधूर किणकिण कानी पडल्याचा भास होतो.एकेक लेख जसजसे वाचत जावे तसतसे लेखांना साजेसे असेच मुखपृष्ठ आहे याची खात्री पटते.
 
पुणे शहरी वास्तव्य असणारे सेवानिवृत्त शिक्षक,आणि सर्वांचे लाडके कवि/लेखक श्री. अरूणजी पुराणिक यांची या पुस्तकाला फार सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. जवळ जवळ प्रत्येकच लेखावर त्यांनी त्यांचे भाष्य केले आहे,ती वाचूनच या पुस्तकाचे स्थान किती मौल्यवान आहे याची कल्पना येते.
 
पैंजण या पुस्तकात त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, घरगुती, प्रेम, वात्सल्य, ममता, विविध क्षेत्रातील व्यक्ती, असे बहुविध विषय हाताळले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुबोध आणि ओघवती भाषा आणि लेखनातून सखोल विचार मांडण्याची हातोटी. नदीच्या प्रवाहाप्रमाणे त्यांची लेखणी सरसर पुढे जाते आणि नदी जशी वाहत असताना दुतर्फा काठावरील लता वेलीना पाणी पाजत पाजत जात असते तद्वतच राधिका ताईंचे लिखाण वाचताना वाचकांची तृष्णा शमून समाधान वाटते.
 
दिवाळी सारख्या मोठ्या सणाचे एक आगळे महत्त्व एक दिवा त्यांच्यासाठी या लेखात आपल्याला वाचावयास मिळते. जे उपेक्षित आहेत, ज्यांच्या घरात रोजची चूल पेटणेही अशक्य आहे,  अशा वस्तीत जाऊन त्यांना दिवाळीचा आनंद देणे ही खरी दिवाळीअसे त्या म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेल्या पसायदानाचा नेमका अर्थ या लेखातून वाचकांना नक्कीच उलगडतो.
 
पैंजण या नादमधूर शब्दाविषयी राधिका ताईनी केलेली सुरुवातच पैंजण या लेखात वाचकांना आकर्षित करते. त्या लिहितात, " पैंजण हा एक तीन अक्षरी अनुनासिक शब्द. पण तो ओठावर येता क्षणीच निसर्गातील संपूर्ण रसमय रुणझुण घेऊन अवतरतो. पैंजण या शब्दात लाडीक भाव आहेत, लडिवाळपणा आहे, वात्सल्य आहे..... " वाचकांना या शब्दातच रुणझुण आहे असं वाटत नाही का? मला तर हा लेख वाचताना छुम छुम करीत लाडिकपणे कृष्णाकडे चाललेली राधाच डोळ्यासमोर उभी राहिली. संपूर्ण लेखाची भाषा किती हळुवार आहे, हेच त्या लेखाचे यश आहे.
 
आईचा डब्बा प्रत्येकाने अनुभवलेला. आईने डब्यात पोळी चटणीचा रोल दिलेला असो, पोळी भाजी तर कधी इडली चटणी असो, किंवा उपमा पोहे असोत  या डब्याच्या आठवणीने  सुखद अनुभूतीचा पुनःप्रत्यय घेताना फार आनंद वाटतो. म्हणूनच हा लेख मला पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो. आपल्या मुलांसाठी पोळी भाजीचा डबा करताना, आईच्या हातच्या डब्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जीवनातील असे छोटे छोटे क्षण, परंतु ब्रह्मानंद देणारे लेखिकेने टिपले आहेत. अगदी साधा विषय परंतु किती आनंद देणारा.
 
गौराई आली,ॠषिपंचमी महात्म्य अक्षय तृतीया हे लेख वाचताना हिंदू संस्कृती, परंपरागत चालत आलेले हे सण, त्यामागील कथा या सगळ्यांचा राधिका ताईंनी परामर्श घेतला आहे.  तसेच भारत हा कृषीप्रधान देश आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता आपले बहुतांशी सणवार, उत्सव आपल्या भूमीशी, मातीशी जोडलेले आहेत यावर लेखिकेने विशेष भर दिल्याचे जाणवते. या सणांच्या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे जरुरीचे आहे ही शिकवण मिळते.
 
या जगण्यावर शतदा प्रेम करावे हा लेख! शीर्षक वाचल्या वाचल्या काहीतरी गहन विचार मांडले असावेत अशी शंका येते,  परंतु त्या लेखाची सुरुवातच अशी करतात की त्यांना वाचकांना कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही.  या लेखात आपल्याला फक्त राधिकाताईच दिसतात. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची विचार करण्याची पद्धत, आणि मनात जे आहे, ते स्पष्टपणे,  निर्भीडपणे मांडण्याची त्यांची वृत्ती स्वच्छ दिसते. आजच्या काळाला अनुसरून त्यांनी जीवनाचा इनबॉक्स, अज्ञात सेंडर, रोजच्या रोज येणाऱ्या मेल्स, त्यातल्या मोजक्या वाचायच्या बाकी डिलीट करायच्या अशा प्रकारची शब्दयोजना करून वाचकांचे मनोरंजनही केले आहे. वाचकांना पुस्तकात कसे खिळवून ठेवावे हे राधिका ताई चांगले जाणतात यात शंकाच नाही.
 
राधिका ताई त्यांच्या मतांविषयी ठाम असतात आणि ती मते त्या प्रामाणिकपणे मांडतात.नांदतो देव हा आपल्या अंतरी हा लेख वाचताना याची प्रचिती येते.  त्या कबूल करतात की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या गोष्टी केवळ आपले कुटुंबीय, सगे सोयरे श्रद्धेने करतात म्हणून आपणही करावयास पाहिजेतच असे त्यांना कधी वाटत नाही. त्या देवळाच्या रांगेत देवदर्शनासाठी उभ्या राहणार नाहीत, पण म्हणून त्या नास्तिक आहेत असं नाही. देव म्हणजे नक्की काय? अस्तिक्यवाद, ईश्वर वाद वगैरे क्लिष्ट तत्त्वज्ञानात डोके घालण्याची त्यांची इच्छा नाही, कारण त्या सामान्य बुद्धीच्या आहेत हे कबूल करण्याची प्रामाणिकता त्यांच्यात आहे. शाळेत मॉरल सायन्समध्ये शिकलेले " गॉड इज एव्हरीव्हेअर" हे वाक्य त्यांच्या मेंदूत चिकटलेले आहे.
 
क्षमा करणे ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. क्षमा एक अप्रतिम गुण या लेखात क्षमेचे महत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. ज्याला क्षमा करता येत नाही त्याची वृत्ती हिंसक आहे असे त्यांना सांगायचे आहे. कारण त्या लिहितात की आजकाल विविध माध्यमातून" मै तुम्हे देख लूंगा" मुझसे बढकर कोई बुरा नही" " आज पर्यंत माझी मैत्री पाहिलीस आता दुश्मनी अनुभव" अशा प्रकारची वाक्ये कानावर सतत आदळत असतात. ही सूडबुद्धी दर्शविणारी वाक्ये म्हणजे वाद,अशांतता माजविणारी हिंसक भाषा आहे."
 
उन्हाळ्यात बागेतील सर्वच झाडे जेव्हा मरगळलेली दिसतात तेव्हा कोपऱ्यात वाढलेला निवडुंगच तेवढा आपले काटे दिमाखाने मिरवत हिरवा गार राहिलेला असतो. लेखिकेच्या मनात येते की तिनेही असेच निवडुंगासारखे विराट वाटेवरही टवटवीत राहावे. मनातली ही भावना व्यक्त करणारा निवडुंग हा लेख, वाचनीय!
 
जनरेशन गॅप हा प्रश्न नेहमीच सर्वांना भेडसावणारा आहे.  हाच विषय घेऊन वृद्ध आणि तरुण पिढीतील वैचारिक अंतर हा लेख राधिकाताईंनी लिहिला आहे. दोन पिढ्यातील अंतर आणि वैचारिक वाद हे सर्वच काळात चालू असतात आणि असणारच पण म्हणून आधीच्या पिढीतील वृद्धांनी त्यांच्या काळानुसार समजून घेणे किती आवश्यक आहे हे राधिका ताई या लेखात आवर्जून सांगतात. त्यांचे विचार किती प्रगल्भ आणि प्रॅक्टिकल आहेत हे हा लेख वाचताना जाणवते आणि त्यांच्याविषयी मनात आदरभाव निर्माण होतो. "नव्या कडे नव्याने दृष्टी बाळगावी. तक्रारीच्या सुरापेक्षा स्वीकृतीची, शिकण्याची मानसिकता बाळगावी तेव्हाच दोन पिढीतील वैचारिक अंतर सुसह्य होईल" हा फार मौलिक संदेश त्यांनी वाचकांना दिला आहे.
 
सर्वच पस्तीस लेखांवर भाष्य करणे उचित  ठरणार नाही. थोडक्यात परामर्श घेताना एवढेच सांगेन की या ती आनंदाचे झाड लावून गेली अशा लेखातून मातेची ममता वात्सल्य तिने केलेले संस्कार यांचे किती महत्त्व असते,अशी ही शाळा यातून दिसणारा नात्यातला ओलावा, पुतळाबाईच्या जीवनातील कारुण्य, तरी करारी व्यक्तिमत्त्व, सावरकरांच्या जाज्वल्य आठवणी हे सर्व वाचताना मनातील अनेक भावना उचंबळून येतात.
 
या पुस्तकातील प्रत्येकच लेख वाचकांना अंतर्मुख करतो आणि त्या त्या विषयावर चिंतन करावयास लावतो. राधिका ताईंच्या लेखणीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही विषय हाताळताना त्या त्या संदर्भात राधिका ताई त्यांच्या जीवनातील विविध कटू गोड अनुभव सांगतात, त्यामुळे कोणताही विषय कधीच क्लिष्ट वाटत नाही. एक एक लेख जसजसे वाचत जावे, तसतशा राधिकाताई वाचकाला समजत जातात. त्यांचा वाचन ~लेखनाचा छंद, त्यांची रुढी परंपरा याविषयीची परखड मते, त्यांची सकारात्मक मानसिकता, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतूनही काहीतरी शिकण्याची त्यांची जिज्ञासा, त्यांचे संवेदनशील मन, त्यांच्या विचारातील स्पष्टता असे नाना रंगी व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांच्या लेखनातून उलगडत जातात. नकळतपणे वाचकांची आपापल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलत जाते हा माझा अनुभव आहे. राधिका ताईंचे एक एक लेख कुठेतरी आपल्याही जीवनाशी निगडित आहेत असे वाटते आणि हेच त्यांच्या लेखनाचे यश आहे.
 
पुस्तकाचे नाव: पैंजण
लेखिका- सौ राधिका भांडारकर
प्रस्तावना: मा. श्री अरूण पुराणिक,पुणे
प्रकाशक-शॉज़न ऑनलाईन,अहमदाबाद
मुखपृष्ठ- वैदेही आपटे 
 
* अरुणा मुल्हेरकर*
मिशिगन अमेरिका

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Valentine day 2024 : व्हॅलेंटाईन डेचा इतिहास, संत व्हॅलेंटाईन कोण आहेत?