औषधे घेताना- उपयुक्त पुस्तक
'
औषधे घेताना रुग्ण समुपदेशन' या डॉ.आत्माराम पवार यांच्या गौतमी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सामान्य रुग्णांना दिलासा मिळवून दिला आहे. आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी दवाखान्याची पायरी चढावीच लागते. त्यावेळी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे कशी घ्यावीत, दोन वेळेच्या औषधांच्या मात्रेत किती अंतर असावे, जेवणापूर्वीची आणि नंतरची औषधे किती वेळापूर्वी घ्यावीत या आणि अशा बर्याच प्रकारच्या शंका प्रत्येकाच्या मनात डोकावतातच. अशा प्रकारच्या अनेक़ प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातुन मिळण्यास मदत होईल.या पुस्तकात डॉक्टरांबरोबरच औषध विक्रेत्यांसाठीही काही गोष्टी सुचवल्या आहेत. त्या सूचना खरोखरच उपयोगी अशा आहेत. पण त्यामुळे लोकांचा त्या डॉक्टरांबरोबरच औषध विक्रेत्यांवरचा विश्वासही वाढेल. सर्वसामान्य लोकांपेक्षा औषध विक्रेत्यांना वैद्यकीय परिभाषेची जास्त माहिती असल्याने काही वेळा रूग्णाच्या मनातल्या शंका ते सहज दूर करू शकतात.औषधं वेगवेगळ्या रुपात का असतात, ती त्या रुपात घेण्याने काय फायदे तोटे आहेत, त्याचबरोबर ती घेण्याची योग्य पध्दत कोणती याची सखोल माहिती या पुस्तकात दिली आहे. स्वत:च्या मनाने घेतलेल्या वेगवेगळ्या औषधांचे शरीरावर काय परिणाम होतात याचीही विस्तारीत माहिती या पुस्तकात दिलेली आहे.औषध म्हणजे काय हे अगदी घरगुती स्वयंपाकातल्या साध्या उदाहरणाने सांगितल्याने त्यामागचे शास्त्र पटकन समजते. गोळ्यांचे वेगवेगळे प्रकार त्या घेण्याच्या पध्दती, पातळ औषधे व ती कशी घ्यावीत ह्यासारख्या गोष्टीही बारकाईने लिहिल्या आहेत.शरीरावर लावण्यात येणारी मलमे, वेगवेगळ्या भागात ती लावण्याच्या योग्य पद्धती, डोळ्यांचे ड्रॉप्स, इंजेक्शन्स, ती देताना घ्यावयाची काळजी याचीही माहिती ह्यात आहे. मधुमेह, बी.पी, अस्थमा, दमा, कुटुंब नियोजन यासारख्या विषयांवरील औषधांच्या माहितीबरोबरच, हे सगळे होण्याची कारणे, घ्यावयाची इतर काळजी ही सुद्धा सोप्या भाषेत आहे.औषधे कशी आणि कुठे साठवावीत, प्रत्येक औषधाची एक्स्पायरी कशी ठरते यासारख्या नेहमी पडणार्या प्रश्नांची उत्तरे लेखकाने अगदी सोप्या भाषेत दिली आहेत. म्हणूनच ही माहिती सर्वसामान्यांना या विषयात जागरूक करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
-----
औषधे घेताना- रुग्ण समुपदेशन लेखक- डॉ. आत्माराम पवार पाने- १७६ गौतमी प्रकाशन, नाशिक किंमत- १२० रूपये. पुस्तकासाठी संपर्क- 253- 2311422, 2576175 (नाशिक)91 20 24497602 (
पुणे)