बौद्ध तत्त्वज्ञानातील विपश्यना साधना मार्गाला अतिशय भक्कम असे तात्त्विक अधिष्ठान आहे. त्यात प्रामुख्याने पांच सिद्धांताचा समावेश होतो. ते सिद्धांत म्हणजे -
1. सर्वं क्षणिकम् (किंवा सर्वंअनित्यम्)
2. सर्वं दु:खम्
3. सर्वं अनात्मम्
4. सर्वं स्वलक्षणम् (किंवा, सर्व तथात्वम्)
5. निर्वाणं शान्तम्.
बौद्ध संप्रदायामध्ये अनेक मतमतान्तरे आहेत. परंतु त्या सर्वांचे या पाच सिद्धांतावर मात्र एकमत आहे. या पाच सिद्धांतापैकी एखादा सिद्धांत एखद्या संप्रदायाला मान्य नाही असे होऊच शतक नाही. कारण त्यातील एका सिद्धान्ताला अमान्यता म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानालाच अमान्यता देण्यासारखे होईल. यापैकी सर्वं क्षणिकम् या वचनानुसार वस्तूचे सर्व धर्म अनित्य आहेत. त्यासाठी ते खालील युक्तिवाद देतात.
1. सर्व क्षणिकम् - ते म्हणतात, जे अस्तित्वात आहे म्हणजे जे सत् आहे ते क्षणिकच असणार. अस्तित्व म्हणजे तरी काय? एखादी गोष्ट आहे याचा अर्थ काय? बुद्ध म्हणतात, याचा अर्थ त्यास 'अर्थक्रियाकारित्व' आहे. या पारिभाषिक शब्दाचा अर्थ आहे काहीतरी घडवून आणण्याचे सामर्थ्य अथवा कारकत्व, जे काहीच करीत नाही, ज्याच्या योगाने काहीच घडत नाही, ते असून नसून सारखेच. खरे म्हणजे त्याच्या अस्तित्वास काही पुरावाच नाही. ते नाहीच, जर क्रिया नाही किंवा क्रिया करण्याचे सामर्थ्य नाही, तर अस्तित्वही नाही. एखादी गोष्ट 'आहे' याचा अर्थ तिच्याने काही निष्पन्न होते. काहीतरी घडवून आणण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे असा होतो. पण असे घडून येणे म्हणजे पहिल्या गोष्टीने नाहीसे होणे आलेच. बीजातून अंकुर फुटतो पण त्या वेळी बीज नाहीसे होते. काहीतरी उत्पन्न केल्याशिवाय अस्तित्व नाही पण दुसरे काही उत्पन्न होण्यासाठी स्वत:चा विनाश ओढवलाच. याचाच अर्थ असा की सर्व धर्म क्षणिक आहेत. कोणी असे म्हणेल की कुणग्यात ठेवलेल्या बियांच्या ठिकाणी अंकुरोत्पत्ती हे कार्य घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे, पण ते घडवून न आणता कितीतरी क्षण ते कुणग्यात तसेच टिकून राहतात. ते बी अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. त्याच्या ठिकाणी कार्य घडवून आणण्याते सामर्थ्यही आहे पण त्यास क्षणिक म्हणता येणार नाही. बुद्धांचे त्यावर उत्तर असे आहे की, घडवून आणण्याचे सामर्थ्य तत्काल दिसलेच पाहिजे. काही क्षणापर्यंत त्या सामर्थ्याने वाट पाहिली असे म्हणता येणार नाही म्हणजे कुणग्यात असलेले बीज काही कालाने शेतातल्या मातीत रुजेपर्यंत त्यात काही ना काही परिवर्तन घडतच असते. काही जुन्या बीजांची अंकुर उत्पन्न करण्याची क्षमता वाढते तर काहींची कमी होते म्हणजे कमी वा अधिक असा बदल त्यामध्ये होतच असतो. थोडक्यात बीज आहे म्हणणे म्हणजेच त्यात अर्थक्रियाकारित्व आहे आणि म्हणून ते क्षणिक आहे.
दुसरा युक्तिवाद असा. आपल्या भोवताली असलेल्या समग्र अस्तित्वामध्ये प्रतिक्षण बदल होत असतात. म्हणूनच आपण म्हणतो की अहो, तो 200 वर्षे जुना असलेला वटवृक्ष कालच्या वादळात जमीनदोस्त झाला. त्याचा अर्थ 200 वर्षे प्रतिक्षण त्यात बदल होत होता. या दृष्टीने झाड, पुस्तक, टेबल, डोगर, नदी, नाले, माणसे सर्वच प्रत्येक क्षणी बदलत असतात. म्हणूनच एखाद्या लहान मुलाला 5-10 वर्षांनी पाहिल्याबरोबर आपण म्हणतो, 'वा! चांगलाच उंच झालास! याचा अर्थ त्याची उंची त्या 5-10 वर्षात प्रतिक्षण वाढत होती. एका रात्रीतून तर ती वाढली नाही. थोडक्यात बुद्धांनी या सर्व उदाहरणांतून 'सर्व क्षणिकम्' हा आपला सिद्धान्त प्रस्थापित केला आहे.
यातूनच पुढे क्षणभंगवाद या सिद्धान्ताचीही उत्पत्ती झाली. हा सिद्धांत केवळ घटपट अशा बाह्य जड पदार्थांना म्हणजे रूपस्कंधांनाच लागू आहे असे नाही, तर आंतरिक म्हणजे चित्तचैत्यस्कंधांनाही लागू आहे. गेल्या क्षणीचा घट आणि या क्षणीचा घट हे जसे एकमेकांपासून भिन्न आहेत तसेच गेल्या क्षणीचा मी आणि या क्षणीचा मी हेही एकमेकांपासून निराळे आहेत. परंतु मग शंका निर्माण होते की, प्रत्येक क्षणाचा घट वेगवेगळा असूनही आपण तोच घट म्हणून त्यास कसे काय ओळखतो? बुद्धांचे यावर उत्तर असे की, प्रत्येक क्षण पुढच्या क्षणी त्याच्या सारख्याच घटाला जन्म देतो. या सादृष्यामुळे तादात्म्याचा आभास होऊन हा तोच घट आहे जो की काल तुमच्याकडे पाहिला होता असते आपण म्हणतो. यावर आणखी एक शंका अशी निर्माण होते, की घटाच्या सादृष्यामुळे तादाम्म्याचा भास होते हे खरे असले तरी कालचाच मी आजही आहे अशी स्वत:संबंधीची जाणीव भ्रमात्मक कशी मानता येईल? परंतु बौद्ध तत्त्वचिंतकांनी मी संबंधीचे हे तादाम्म्याचे स्मरण भ्रम ठरविले हे मात्र खरे! त्यांनी कुठल्याही अर्थाने नित्य आत्मतत्त्व मानण्याचे नाकारले. दिव्याच्या ज्योतीत भिन्नभिन्न तैलकण जळत असल्याने दर क्षणाला नवीन ज्योत उत्पन्न होत असतांनाही त्यांच्यातील सादृष्यामुळे त्या ज्योति:संतानाला आपण तीच ही ज्योत असे मानतो. तद्वतच दर क्षणाचा 'मी' भिन्न असतांनाही आपणांस नित्य आत्म्याचा भास होतो असेच सर्व बौद्ध दर्शनांनी प्रतिपादले आहे.
2. सर्वं दु:खम् - हे सर्व बौद्ध संप्रदायांना समान असलेले दुसरे सूत्र होय. जरा, व्याधी व मृत्यू या स्वरूपातील मानवी दु:ख पाहिल्यामुळेच राजपुत्र सिद्धार्थाने आपला नेहमीचा जीवनक्रम सोडून दिला व नव्या मार्गाचा शोध केला. आर्य अष्टांगमार्ग आक्रमित असतांना त्यातील निरनिराळ्या टप्यांवर संसाराच्या दु:खमयतेचे चिंतन कसकसे करावे यासंबंधी खुलासेवार उपदेश खुद्द बुद्धानेच केलेला आहे. तो उपदेश विपश्यना मार्गात आपणांस निरनिराळ्या रूपात भेटतोच.
जीवनाच्या दु:खमयतेवर बौद्ध दर्शनात पराकाष्ठेचा भर दिला असला तरी त्यास दु:खवादी दर्शन असे एकांतिपणे म्हणता येणार नाही. त्यांतील दु:खवाद प्रारंभिक आहे, अंतिम नाही. कारण दु:खाच्या उपशमाचा मार्ग त्यात सांगितला आहे. दुसरे म्हणजे बौद्ध दर्शनात दु:खाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदात्त आहे. 'सुख पाहता जवापाडे, पु:ख पर्वताएवढे' असा व्यवहारी नाही. येथील दु:ख जसे क्षणिक आहे तसे येथील सुखही क्षणिक आहे. किंबहुना सर्वच क्षणभंगूर, अशाश्वत, परिवर्तनशील असल्यामुळे, आलेले दु:खही कायम ठाण मांडून बसणार नाही, त्याचप्रमाणे सुखही कायमचे असणार नाही. सुख, दु:खाच्या, यशापशयाच्या, जयापराजयाच्या प्रत्येक क्षणी उतावीळ वा अधीर न होता शांतचित्ताने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवल्यास आभाळभर काळेकुट्ट ढगही क्षणात पांगण्यास सुरूवात होते. हे लक्षात आल्याशिवाय रहान नाही.
3. सर्वं अनात्मम् - अनात्मवाद हा सर्व बौद्ध संप्रदायांचा 'आत्मा' आहे असे काहीसे आत्मविसंगत विधान आपणांस बौद्ध दर्शनासंबंधात करावे लागते. आत्मा याचा अर्थ केवळ सजीव पदार्थांच्या ठिकाणी मानला जाणारा आत्मा (Self,Soul)एवढाच नाही. आत्मा म्हणजे ज्या निरनिराळ्या धर्मांचा वा गुणांचा आपणांस प्रत्यय येत राहतो, त्यांना आधारभूत असलेला एक स्थिर पदार्थ. त्यालाच द्रव्य (Substance)हा पारिभाषिक शब्द आहे. उदाहरणार्थ - गंध, रंग, स्पर्श इत्यादी धर्म, फू या पदार्थांच्या ठिकाणी राहतात. हे सर्व धर्म अधांतरी तर राहू शकत नाही. या विविध धर्मांचा जो आधार आहे त्या आधाराला द्रव्य 'सबस्टन्स' किंवा आत्मा असे आपण मानतो. बौद्धांना हा, द्रव्यपदार्थ नाकारायचा आहे. गंध, रंग, स्पर्श इत्यादी धर्मांहून वेगळा असा फूल नावाचा काही द्रव्य पदार्थ नाही. जी गोष्ट फुलासारख्या अचेतन पदार्थांची तीच 'मी', 'तू', 'देवदत्त', या सारख्या चेतन पदार्थांची. प्रतिक्षण निर्माण होणार्या राग, द्वेष, इच्छा, सुख, दु:ख इत्यादी चित्तधर्मांना आधारभूत अशा एका स्थिर पदार्थाची आपण कल्पना करतो व त्यास आत्मा म्हणतो. पण येथेही निरनिराळ्या चित्तधर्मांच्या समुदायांचा (स्कंधाचा) संघात मानून काम भागते.
ग्रीक राजा मिलिंद व भिक्षु नागसेन यांची गोष्ट प्रसिद्धच आहे. नागसेनाने प्रश्न केला, 'महाराज, आपण कसे आलात?' राजा म्हणाला, 'रथातून आलो. 'नागसेन म्हणाला, 'रथ कशाला म्हणायचे, काय चाके म्हणजे रथ, की कणा म्हणजे रथे की घोडे म्हणजे रथ?' अशा वेगवेगळ्या अवयवांहून वेगळा असा रथ नांवाचा पदार्थ दाखविता येणार नाही. खरोखर रथ म्हणजे या सर्व अवयवांचा केवळ संघातच होय. हीच गोष्ट ज्यास आपण 'मी' म्हणतो त्याचीही आहे. 'तू' किंवा 'मी' धर्मांच्या स्कंधांचे संघातच होय. या संघाताहून वेगळ्या स्थिर आत्म्याची आपण कल्पना करतो तीच आपल्या तापाला कारण होते. तेथपर्यंत सांगितलेल्या अनात्मवादाला 'पुद्गलनैरात्म्य' व पुढे जाऊन 'धर्म नैरात्म्य' असे म्हटले आहे.
4. सर्वं स्वलक्षणम् - स्वलक्षण म्हणजे मानवी बुद्धीने आणि कल्पनेने भरीस घातलेला सारा भाग वगळल्यावर पदार्थांच्या प्रत्यक्ष ज्ञानाच जो भाग शिल्लक उतरो तो. तेवढ्या उरलेल्या भागासच 'वास्तविक आहे' (Really exist)असे म्हणता येईल. स्वलक्षण एवढेच काय ते परमार्थत: 'सत्' अथवा 'वस्तु' होय. पदार्थाचे नेहमी जे ज्ञान आपणांस होते त्यातील बराचसा भाग बुद्धिनिर्मित असतो, हे आपल्या सहसा लक्षात येत नाही. 'हे दूध पांढरे आहे असे जे प्रत्यक्ष ज्ञान होते ते संबंधच्या संबंध काही वस्तुगत नसते. 'दूध' ही पदार्थांची एक जाती परंतु जाती या मानवनिर्मित असतात हे अगदी उघड आहे. वास्तवात नुसत्या व्यक्ती असतात. जाती ही आपल्या मनातील कल्पना आपण त्यांच्यावर लादतो. पांदरेपण ही सुद्धा अनेक रंगच्छटांना सामावून घेणारी एक जाती आहे. तसेच 'पांढरे' हा दुधाचा गुण इतर रंगांशी तुलना करूनच ठरणार. म्हणजे जे स्वलक्षण नव्हे. स्वलक्षण हे त्याच पदार्थामध्ये राहणारे, 'स्व' मध्येच राहणारे असले पाहिजे. पण 'पांढरे' हा गुण इतरांच्या तुलनेत जेव्हा निश्चित केला जातो तेव्हा त्याचा आधार 'स्व'च्या बाहेर आहे हे सिद्ध होते. अशा रितीने द्रव्य, जाति, गुण, कर्म, नाम हे पाच विकल्प किंवा ज्ञानाचे आकार काढून टाकल्यावर जे उरते ते 'स्वलक्षण' होय. तेच वास्तविक आहे. प्रत्येक पदार्थ स्वलक्षण आहे, म्हणजे तो इतर कशासारखा नाही. तो त्याच्यसारखाच आहे, 'युनिक' आहे. ज्ञानाच्या या आकारांना वा विकल्पांना वजा करण्याच्या प्रक्रियेला बौद्ध दर्शनात 'क्लपनापोढम्' हा पारिभाषिक शब्द आहे.
5. निर्वाणं शान्तम् - हा बौद्ध दर्शनातील शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा सिद्धांत होय. त्याचा अर्थ निर्वाण नावाची अत्यंत शांत (तृष्णेचा पूर्ण उपशम असलेली) अशी एक अनुभाव्य स्थिती आहे, असा करता येईल. ती स्थिती कशी असते? निर्वाण म्हणजे स्वरूपत: कोणती स्थिती? इत्यादी प्रश्न निर्माण होतात.
निर्वाण या शब्दाचा अर्थ (दिवा किंवा ज्योत) विझणे, शांत होणे असा होतो. जीवनास ज्योतीची उपमा बौद्ध दर्शनात वारंवार येते. त्या उपमेने जशी अनात्मचा सुचवायची असते तशीच जीवनाची तापदायकताही सुचवायची असते. तेव्हा जीवन ज्योत शांत होणे, जीवनाच्या तापाचा उपशम होणे म्हणजे निर्वाण. दिव्याने दिवा लागावा तसे स्कंधाच्या एका संघातापासून दुसरा स्कंध संघात निर्माण होत असतो. हे क्षण संतान आपोआप नष्ट होणारा नही. बारी निदानांचे (कड्यांचे) रहाटगाडे कायमच चालू राहील. त्याच्या बुद्धीपूर्वक निरोध करावा लागतो. बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगमार्गाने तो निरोध केल्यावर जी स्थिती रहते त्यास निर्वाण म्हणावयाचे. 'निर्वाण' म्हणजे काहीच नाही असे होणे. व्यक्तित्वाचा पूर्ण निरास होणे. अहंकार एखाद्या पक्क फळाप्रमाणे गळून पडणे म्हणजे निर्वाण. येते व्यक्तित्वाचा निरास म्हणजे अस्तित्वाचा निरास नव्हे. तो निर्वाणपदी पोहोचला म्हणजे मृत्यू पवला असा याचा अर्थ नाही. जो निव्वळ साक्षीभावात जीवन जगतो, कुठल्याही वादळ-वार्याने ज्याची जीवनज्योत फडफडत नाही, अचल, निष्कंप रहाते त्यांस निर्वाण प्राप्त झाले असे म्हणता येईल. स्वत: बुद्धाने मृत्यूनंतर तथागताचे काय होते? या प्रश्नास उत्तर देण्यास नकार दिला होता. यावरून आपण म्हणू शकतो की निर्वाण म्हणजे अशी अवस्ता की जिच्यासंबंधी कसलेच विधान करता येत नाही. ती एक अनिर्देश्य, अनीर्वाच्य स्थिती आहे. बुद्धाचा उपदेश प्राय: नैतिक स्वरूपाचा हाता हे लक्षात हेऊन निर्वाण म्हणजे चौथाही एक अर्थ करता येतो. सर्व नैतिक गुणांची कमाई करून पूर्णावस्थेस पोहोचलेल्या अर्हताच्या मनाची प्रसन्न, गंभीर आणि शांत अवस्था म्हणजे निर्वाण अवस्था होय.