रेल्वेचे तिकिट घेण्यासाठी लागलेली लांबच लांब रांग हा आता भूतकाळ ठरणार आहे. कारण रेल्वे आता तिकिटे देणारी जास्तीत जास्त स्वयंचलित यंत्रे बसविणार आहे. सध्या केवळ अडीचशे अशी यंत्रे आहे, त्याची संख्या पुढील दोन वर्षांत सहा हजारांवर जाईल.
त्याचवेळी विनारक्षित तिकिट पद्धती (यूटीएस) काऊंटरची संख्याही तीन हजारांवरून पंधरा हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याचवेळी मोबाईल फोनद्वारे ही तिकिटे देण्यावरही विचार केला जात आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तिकिट खिडकीपुढे लागलेल्या लांबच लांब रांगा संपविण्याचा विचार असल्याचे सांगून लालू म्हणाले, आता प्रवासी कोणत्याही पद्दतीने तिकिट खरेदी करू शकतात. त्यांच्या घरात संगणकापुढे बसून, मोबाईल फोनद्वारे, त्यांच्या शेजारी असलेल्या काऊंटरवरून, स्वयंचलित यंत्राद्वारे किंवा अगदी स्टेशनवरील व्हेंडींग मशीनमधून. जनसाधारण बुकींग सेवेचा सर्व झोनल रेल्वेमध्ये विस्तार करण्यात येईल, असे सांगून, याद्वारे अनेक बेरोजगार तरूणांना रोजगार मिळेल आणि तिकिटेही सहजगत्या उपलब्ध होतील.
याशिवाय प्रतीक्षा यादीवर असलेल्या प्रवाशांना ई-तिकिट देण्याच्या सुविधेच्या विस्तारावरही विचार केला जात आहे. सद्या ही सेवा एक लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे. ती पुढील वर्षात तीन लाख लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.