Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लालू नव्हे चालू यादव- मुंडे

लालू नव्हे चालू यादव- मुंडे

महेश जोशी

रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी बीडच्या जनतेची घोर फसवणूक केली आहे.वारंवार मागणी करूनही पुन्हा एकदा बीडच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.हा लालू यादव नसून चालू यादव आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केली.
अहमदनगर - परळी- बीड रेल्वे मार्गाचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून रखडलेला आहे.या मार्गाच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. मंगळवारी लालू प्रसाद यादव संसदेत रेंल्वे अर्थसंकल्प सादर करित असतांना बीडमधील हजारो नागरीक रस्त्यावर उतरले होते.यावेळी रेल्वे कृती समितीतर्फे रास्ता रोको आणि कडकडीत बंद पुकारण्यात आला.यामुळे तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला.रस्त्यावर दूर दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.दुपारी एकच्या सुमारास गोपीनाथ मुंडे यांचे आगमन झाले आणि उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला.कडक उन्हात मुंडे यांनी तब्बल अर्धा तास आंदोलकांना मार्गदर्शन केले.यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून लालू यादव यांच्यावर त्यांनी टिकास्त्र सोडले.
मुंडे म्हणाले, मराठवाडा मुक्ति संग्रामात बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वाधिक तुरूंगवास भोगला आणि निझामांना पळता भुई करून सोडले.निझाम तर परकीय होते. मग राज्यातील आघाडी सरकारला पळवून लावणे काय कठिण आहे? रेल्वेप्रश्नी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आंदोलनात सहभागी तरूणांकडे बोट दाखवित ते म्हणाले, आमचे आता वय झाले आहे. मात्र यांच्या मनगटीत भरपूर जोर आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने पाठपुरावा केला.मात्र, सरकारला जाग येणार नसेल तर रेल्वेसाठी हिंसक मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. देशमुख सरकारच्या लंकेला आग लावून रेल्वे खेचून आणू, असे त्यांनी ठासून सांगितले. रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी बीडच्या नागरिकांना धोका दिला असून हा लालू नव्हे तर चालू यादव आहे अशी टीका त्यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi