आपण कार्टून, जंगल बुकसारखे चित्रपट बघतो. मोबाइल गेम्स खेळतो. यातली सगळी पात्रं ही अॅनिमेशनची कमाल असते. सध्या अॅनिमेशन, ग्राफिक्सला प्रचंड मागणी आहे. अॅनिमेशन अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही विविध पदांवर कामं करू शकता. मालिका, चित्रपट तसंच जाहिरातींच्या क्षेत्रात अॅनिमेशनला खूप मागणी आहे. अॅनिमेशनमधल्या संधीविषयी...
* एखादी संकल्पना मांडून कथानक तयार केल्यानंतर ही संपूर्ण माहिती एका स्टोरीबोर्डवर उतरवून काढली जाते. कथानकानुसार यातले तज्ज्ञ स्टोरीबोर्ड तयार करतात. त्यांना स्टोरीबोर्ड आर्टिस्ट असं म्हटलं जातं. हे तज्ज्ञ कथेतल्या मोठ्या दृश्यांसाठी व्हिज्युअल्स तयार करतात. सध्या स्टोरीबोर्डसाठी फोटोशॉप किंवा प्रो यासारख्या सॉफ्टवेअर्सची मदत घेतली जाते.
* कथेतल्या पात्रांनावास्तववादी दाखवणं तसंच कथानकाशी जोडून घेण्याचं काम रिगिंग आर्टिस्ट करतात. मोठ्या स्टुडिओमध्ये हे काम मॉडलर्स करतात तर छोट्या स्टुडिओमध्ये अॅनिमेटर्सनाच रिगिंग आर्टिस्ट आणि मॉडलर्सचं काम करावं लागतं.
* निर्मितीनंतरचं काम पाहण्यासाठी कॉम्पोजिटर्सची निवड केली जाते. हे तज्ज्ञ अॅनिमेटर्स, अॅनिमेशनमधील करिअरवाट मॉडलर्स आणि रिगिंग आर्टिस्टचं काम एका साच्यात बसवण्याचं काम करतात. सध्या कॉम्पोजिटर्सना बरीच मागणी आहे.
* व्हिज्युअल इफेक्ट्स तसंच डिजिटल अॅनिमेशन टीमसोबत लाइटिंग आर्टिस्ट काम करतात. लाइटिंगचा इफेक्ट देण्याची जबाबदारी या लोकांवर असते. अशाप्रकारे या सर्व तज्ज्ञांच्या मदतीने अॅनिमेशन पट तयार होतो.