महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर सोमवारी जाहीर करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या क्लास वन आणि क्लास टू (राजपत्रित) पदासाठी एकच पूर्व परीक्षा त्याचबरोबर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ही एक पूर्व परीक्षा असणार आहे. मात्र, मुख्य परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत. हा बदल 2023 पासूनच्या सर्व परीक्षांपासून लागू होणार आहे. मात्र मुख्य परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत.
एमपीएससीने शासन सेवेतील विविध संवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन अशा विविध बाबींचा विचार करून आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल केल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यसेवा परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमात बदल केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या काही गटांनी आक्रमक होत महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र खुद्द एमपीएससीनेच आंदोलकांना थेट इशारा दिला आहे. आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई केली जाईल. असे आयोगाने म्हटले आहे.