Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

sarthi
, शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (14:40 IST)
दरवर्षी 500 विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण, आकस्मिक खर्च आणि विद्यावेतनाचा लाभ
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम ‘सारथी’ संस्थेमार्फत केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमाला…
 
‘सारथी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण’ योजनेची माहिती आजच्या लेखात आपण घेणार आहोत. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना केंद्रीय नागरी सेवेतील प्रशासकीय पदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘सारथी’संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील तीन प्रशिक्षण संस्था आणि दिल्ली येथील दोन संस्थांची निवड केली आहे. दरवर्षी युपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे एकूण 500 उमेदवारांची निवड करण्यात येते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यासाठी प्रशिक्षणाचे देण्यात येते. निवड झालेल्या उमेदवारांना ‘सारथी’ने निवडलेल्या पाचपैकी कोणत्याही एका संस्थेत प्रवेश घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
 
प्रशिक्षणार्थींना ‘सारथी’मार्फत असे मिळते सहाय्य
उमेदवारांना निशुल्क प्रशिक्षणासोबत दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना तेथील वास्तव्यासाठी दरमहा 13 हजार रुपये आणि पुणे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील वास्तव्यासाठी 9 हजार रुपये दरमहा दिले जातात. तसेच या उमेदवारांचा प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर पुस्तके, स्टेशनरी आदी बाबींसाठी एकत्रित 18 हजार रुपये रक्कम आकस्मिक खर्च म्हणून दिली जाते. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी एकरकमी 25 हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते.
 
योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत प्रमुख अटी
उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील 21 ते 32 वर्षे वयोगटातील असावा. याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा अधिक नसावे. उमेदवाराच्या नावाचे तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षीचे उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी.  उमेदवाराने इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.
 
अशी आहे उमेदवारांची निवड पक्रिया
‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित ‘सीईटी’मध्ये प्राप्त गुणांद्वारे केली जाते. या गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाते.
 
 ‘सारथी’च्या प्रशिक्षणातून घडले 12 आयएएस, 18 आयपीएस…
‘सारथी’मार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण घेवून 2020 ते 2022 या गत तीन वर्षात 12 उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि 18 उमेदवार भारतीय पोलीस सेवेमध्ये (आयपीएस) दाखल झाले आहेत. तसेच 8 जणांची भारतीय राजस्व (आयआरएस) सेवेत, एका उमेदवाराची भारतीय वन सेवेत (आयएफएस) तर 12 जणांची इतर केंद्रीय सेवांमध्ये निवड झाली आहे.
 
सन 2023-24 मधील प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत करता येईल अर्ज
सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

6 formulas for better health! उत्तम आरोग्याची 6 सुत्रे !