लहानपणी आकाशात विमान जाताना पाहून अनेकांनी आपणही त्या विमानाचा पायलट व्हावं असं वाटतं.
विमान आपल्यातल्या प्रत्येकासाठी अचंबित करणारी गोष्ट असते. आपण असंही ऐकलेलं असतं की वैमानिकांना लाखोंच्या पगाराची नोकरी असते.
लहान असताना आपल्यापैकी कित्येकांनी वैमानिक होण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. पण या स्वप्नाला संधीच न देता आपण इतर मार्ग चोखळतो.
व्यावसायिक वैमानिक होणं तितकं अवघड आहे का? त्यासाठी किती खर्च येतो? त्यासाठी कोणता अभ्यास करावा लागतो?
जर तुम्हाला वैमानिक व्हायचं असेल तर हा लेख तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास तुम्हाला मदत करेल.
हा लेख एका खाजगी विमान कंपनीत सह-वैमानिक म्हणून काम करणाऱ्या तमिळनाडूच्या प्रिया विग्नेश यांनी बीबीसी न्यूज तामिळला दिलेल्या माहितीवर आधारित आहे.
वैमानिक होण्यासाठी तुम्हाला 5 पायऱ्या पार कराव्या लागतात
मूलभूत विषयात प्राविण्य
फिटनेस चाचणी पास करणं
नागरी विमान वाहतूक संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणं
200 तासांचं उड्डाण प्रशिक्षण
टाईप रेटिंग
वैमानिक होण्यासाठी मूलभूत पात्रता काय आहे?
एखाद्या व्यक्तीला इतक्या सहजासहजी विमान उडवणं शक्य नसतं. त्यासाठी काही कौशल्य आणि पात्रतेची आवश्यक असते. यासाठी अनेक पायऱ्या देखील आहेत. पहिलं म्हणजे मूलभूत प्रशिक्षण.
बारावीमध्ये तुम्हाला गणित, भौतिकशास्त्र या विषयात उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. तुम्ही डिप्लोमा किंवा इतर कोर्स केले असल्यास काळजी करण्याची गरज नाही. मुक्त विद्यापीठांमधून जरी गणित आणि भौतिकशास्त्र विषय उत्तीर्ण केले तरी पुरेसं आहे.
वैमानिक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं की तुम्ही वैमानिक होता असं नाही. तुम्ही इंजिनीअरिंगचा अभ्यास न करता थेट फ्लाइट ट्रेनिंग स्कूलमध्ये सामील होऊ शकता असं सह-वैमानिक प्रिया विघ्नेश सांगतात.
आयएएस, आयपीएस व्यक्तीला ज्या पद्धतीने यूपीएससी परीक्षेची तयारी करावी लागते, त्याप्रमाणे वैमानिक होण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) द्वारे घेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.
नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे अर्ज
वैमानिक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे अर्ज करावा. यामध्ये आपली कागदपत्रे, गुण प्रमाणपत्र त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करावे लागतील. ही पायरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, तुमच्यासाठी एक युनिक नंबर किंवा आयडी जारी केला जातो.
विमान वाहतूक उद्योगात हा आयडी खूप महत्वाचा असतो. तो जर असेल तरच पुढील प्रशिक्षणासाठी अर्ज करता येतो.
वैमानिक तंदुरुस्त असणं आवश्यक
वैमानिकांसाठी फिटनेस चाचणीचे वर्ग 1 आणि वर्ग 2 असे दोन टप्पे असतात. नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या मान्यताप्राप्त वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळांमधील योग्य प्रमाणित डॉक्टरांकडून ही परीक्षा घेतली जाते. याचे तपशील डीजीसीएच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
यात डोळ्यांची दृष्टी, साखरेची पातळी, रक्तदाब यासह अनेक तपासण्या केल्या जातात. ही चाचणी पूर्ण केल्यानंतर आणि डीजीसीएकडून पूर्ण फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.
जर तुमच्या फिटनेसमध्ये काही कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घेतल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकता.
पूर्ण फिटनेसशिवाय वैमानिक होता येत नाही. एकदा तुम्हाला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले की, तुम्ही उड्डाण प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी विद्यार्थी वैमानिक परवान्यासाठी अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया कशी असते?
वैमानिक होण्यासाठी लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन टप्प्यातील परीक्षा असतात. दोन्हीमध्ये प्रभुत्व मिळवणं आवश्यक असतं.
लेखी परीक्षेत हवामानशास्त्र, हवाई नियमन, हवाई नेव्हिगेशन, तांत्रिक, रेडिओ टेलिफोनी असे पाच विषय असतात. पहिल्या चार परीक्षा डीजीसीएद्वारे घेतल्या जातात. रेडिओ टेलिफोनी ही परीक्षा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाद्वारे घेतली जाते.
या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत उड्डाण प्रशिक्षणातही उत्तीर्ण व्हायला पाहिजे. लेखी परीक्षा पास झाल्यानंतरच प्रात्यक्षिक परीक्षा देणं फायद्याचं आहे. लेखी परीक्षेत पास न होता प्रात्यक्षिक परीक्षेत सहभागी होण्याचाही काही उपयोग नाही.
प्रात्यक्षिक परीक्षेत फ्लाइट ट्रेनिंग स्कूलमध्ये 200 तासांचा फ्लाइट टाइम पूर्ण करावा लागतो. यात विमान चालवणे, टेक ऑफ, लँडिंग आणि रात्री विमान चालवणे यांचा समावेश असतो. हे पूर्ण केल्यानंतर तुम्ही व्यावसायिक पायलट परवान्यासाठी अर्ज करू शकता.
फ्लाइट ट्रेनिंग स्कूलचा पर्याय
वैमानिक होण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने भारतातील जवळपास 30 हून अधिक फ्लाइट ट्रेनिंग स्कूल म्हणजेच वैमानिक प्रशिक्षण शाळांना मान्यता दिली आहे.
यात सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रशिक्षण शाळांचा समावेश आहे. याविषयीची संपूर्ण माहिती डीजीसीएच्या वेबसाइटवरून मिळू शकतो.
आता कोणत्याही प्रशिक्षण शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी सावध राहिलं पाहिजे. कारण प्रशिक्षणाची योग्य सोय नसताना लाखोंची रक्कम मिळवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.
प्रशिक्षण शाळांबद्दल सखोल संशोधन करून आणि माजी विद्यार्थ्यांशी सल्लामसलत केल्यानंतरच प्रवेश घेणं योग्य ठरू शकतं.
या प्रशिक्षण शाळांची संपूर्ण रक्कम एका हप्त्यात भरणं योग्य नाही. या प्रशिक्षण शाळांच्या ऑपरेशन्सबद्दल शक्य तितकी माहिती घेऊन 4 किंवा 5 हप्त्यांमध्ये फी भरा.
डीजीसीएनुसार, कोणत्याही एजंटवर विश्वास ठेऊन प्रवेश न घेता स्वतः माहिती घेऊन प्रवेश घ्यावा.
वैमानिक होण्यासाठी किती खर्च येतो?
भारताच्या बाबतीत सांगायचं तर फ्लाइट ट्रेनिंग स्कूलमध्ये उड्डाण करण्यासाठी प्रति तास किमान 15,000 रुपये खर्च येतो. प्रत्येक ट्रेनिंग स्कूलप्रमाणे हा खर्च बदलतो. पण ट्रेनिंग स्कूलसाठी सरासरी 40 ते 80 लाख रुपये खर्च येतो.
लेखी आणि प्रात्यक्षिक चाचण्या पूर्ण केल्यानंतर, तुम्ही कोणत्याही एअरलाइन्सशी संपर्क साधू शकता. एअरलाइन्सच्या गरजेनुसार, विशिष्ट प्रकारच्या विमानांचं प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला जाईल. याला टाइप रेटिंग म्हणतात.
उदाहरणार्थ, जर एअरलाइन विमानात सह-वैमानिकाची नियुक्ती करणार असेल तर तुम्हाला नियोजित विमान प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
किंवा मग एअरलाइनशी संपर्क न करता, तुम्ही बाजारातील मागणी बघून, परिस्थिती जाणून घेऊन विशिष्ट विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊ शकता आणि सोबतच टाईप रेटिंग प्रशिक्षण घेऊ शकता. भारतात या प्रशिक्षणासाठी 11 ते 21 लाख रुपये मोजावे लागतात.
वैमानिक होण्यासाठी तुम्हाला बँकांकडून कर्जही मिळू शकतं.
याशिवाय केंद्रीय सामाजिक न्याय आणि विकास मंत्रालयाकडून शिष्यवृत्तीही दिली जाते. त्यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, फ्लाइंग ट्रेनिंगसाठी प्रति तास 5000 रुपये स्टायपेंड दिला जातो.
पायलट होण्याचा सर्वात सोपा मार्ग
जर तुमच्याकडे एक ते दोन कोटी रुपये असतील तर तुम्ही कॅडेट पायलट प्रोग्रामद्वारे थेट वैमानिक होऊ शकता.
अनेक नवीन वैमानिक तयार करण्यासाठी भारतातील आघाडीच्या विमान कंपन्या हा कार्यक्रम राबवत आहेत.
त्यामुळे ज्यांना वैमानिक बनण्याची इच्छा आहे ते विशिष्ट एअरलाइन कंपनीमध्ये यासाठी अर्ज करू शकतात. मुलाखती पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना एअरलाइन कंपन्या सर्व प्रशिक्षण आणि नोकऱ्या देतात.
विमान वाहतूक उद्योगातील रोजगार
कमर्शियल पायलट लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही एअरलाइन्समध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. यात परीक्षेच्या 5 फेऱ्या असतात. लेखी चाचणी, पायलट अभियोग्यता चाचणी, मानसिक स्तर चाचणी, गट मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखत.
हे पाच टप्पे उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कनिष्ठ सह-वैमानिक, सह-वैमानिक, वरिष्ठ सह-वैमानिक, प्रशिक्षणार्थी मुख्य वैमानिक, कनिष्ठ मुख्य वैमानिक, वरिष्ठ मुख्य वैमानिक बनू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही प्रशिक्षक देखील बनू शकता.
भारतातील कनिष्ठ सह-वैमानिकांना सुरुवातीला 1 ते 2 लाख रुपये पगार मिळतो. जेव्हा तुम्ही मुख्य वैमानिक बनता तेव्हा तुम्ही किमान 3 लाख रुपये कमवू शकता. शिवाय हा पगार विमान कंपन्यांवरही आधारित असतो.
याशिवाय वैमानिक बनवणारे प्रशिक्षक दरमहा 10 लाख रुपये कमवू शकतात.
तुम्ही सह-वैमानिक म्हणून परदेशात काम करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला भारतीय मूल्यात किमान 8-10 लाख रुपये पगार मिळू शकतो.