महाराष्ट्रातील जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. साधारण 2200 कोटीची दरवर्षी उलाढाल करणारी ही कंपनी 22 उत्पादनाच्या माध्यमातून जगातील 150 देशांना सेवा पुरवण्यात यशस्वी ठरली आहे. मायक्रो इरिगेशन क्षेत्रात या कंपनीने दुसरे स्थान प्राप्त केले आहे. जैन इरिगेशन सिस्टिमच्या यशोगाथेविषयी वेबदुनियेसाठी डॉ. उषा शर्मा यांनी कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष भंवरलाल जैन(मोठे भाऊ) यांच्याशी साधलेला संवाद.... अवघ्या सात हजार रुपयांच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागले असेलच? 'संघर्षातून उत्कर्ष' या आपल्या प्रवासाबाबत काही सांगू शकाल? उत्तर :- व्यक्तीकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला कमी लेखतो. भूतकाळ विसरतो व हवेतच उडायला लागतो. मात्र, तो हे विसरतो की, त्याच्या अशा वागण्याने त्याच्या प्रगतीवर वाईट परिणाम होईल. मी स्वत:ला भाग्यशाली मानतो. कारण मी यशासोबत अपयश देखील पचवले आहे. आणि हीच प्रवृत्ती व्यक्तीला महान करते. देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंह व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही असेच केले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्याचे मी अनुकरण केले आहे. स्वप्न पाहणे काही वाईट नाही आणि मी ही माझ्या व्यवसायाच्या उन्नतीसाठी नेहमी स्वप्न पाहत असतो. मी असे कुठलेच क्षेत्र सोडले नाही की, त्यात मी डोके घातले नाही. जसे की हार्डवेअर, सॉफ्टवेअर, बॅंकिग, माइन्स व जाहिरात आदी क्षेत्रात मी स्वत:ला सिध्द केले आहे. तेव्हा माझ्यासमोर 12 पर्याय शिल्लक होते. त्यातील काही मी सांभाळू शकलो तर काही मला सांभाळता आले नाहीत. त्याच दरम्यान मंदीची लाट आल्याने आय.टी. व टेलीकम्युनिकेशन्स यावर मी प्रभूत्व न मिळवू शकल्याने माझ्या शेअर होल्डर, सप्लायर आदींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसानाची जबाबदारी मी स्विकारून जाहीर सूचनेच्या माध्यमातून सगळ्यांची मी माफी मागितली. त्या वेळी जैन इरिगेशनच्या शेअरची किंमत 9 रुपये झाली होती. त्यानंतर वाढून 700 रुपये झाली व आज 450 रुपयांवर ती स्थिर आहे. कठोर परिश्रम व दृढ इच्छाशक्तिच्या बळावर आम्ही त्या संकटातून सावरलो.
समाजसेवेतही आपण अग्रेसर आहात. आपण स्थापन केलेल्या अनुभूती निवासी शाळेविषयी काही माहिती देऊ शकता ?
उत्तर :- आज कार्पोरेट जगतामध्ये 'सामाजिक उत्तरदायित्व' या गोष्टीचा जो तो गाजावाजा करताना दिसतो. सामाजिक उत्तरदायित्व हेच कर्तव्य, असे मानणारा मी आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाज व कुटुंबाशिवाय तो राहूच शकत नाही. समाजकार्य तर आमच्या नित्य व्यवहाराचे एक अनिवार्य अंग आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चमकण्यासाठी सामाजिक सेवेचा आव आणणारेही समाजात भरपूर भेटतात. मात्र, ते त्याची जबाबदारी विसरलेले असतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची व मुलांची जबाबदारी घेता. त्यप्रमाणे समाजातील गरीब मुलांची देखील आपण जबाबदारी स्विकारली पाहिजे. शासनाने तर नेहमीप्रमाणे याबाबत हात वर केले आहेत. समाजसेवेसाठी तर प्रत्येक कंपनीने हातभार लावला पाहिजे.
मी वयाच्या 25-26 वर्षांपासून स्वत:ला समाजसेवेला वाहून घेतले होते. समाजात मी विविध विकास कार्ये केली आहेत. माझी अशी इच्छा होती की, एका छोट्या निवासी शाळेची स्थापना करावी. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत संस्कार मिळाले पाहिजे. माझी ही इच्छा अनुभूति निवासी शाळेच्या माध्यमातून पूर्ण झाली. यातून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी सुशिक्षित व संस्कारक्षम नागरिक बनेल, असा मला विश्वास आहे.
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 'पद्मश्री'ने सम्मानित झाल्यानंतर आपल्याला काय वाटले?
शासनाने मला 'पद्मश्री'साठी पात्र समजले, मात्र मी आजही स्वत:ला त्या लायकीचा समजत नाही. हा माझ्या त्या कार्याचा सन्मान आहे, जे मी कृषी क्षेत्रात करत आहे. माझा हा सन्मान झाला तो माझा नाहीच तर कृषी देवतेचा व शेतकरी राजाचा सन्मान आहे. शेतकर्यांच्या परिश्रमाचे प्रतीक आहे. मी हा सम्मान त्यांना अर्पण करतो.