राजकारण? नको रे बाबा- किरण बेदी
- भीका शर्मा व गायत्री शर्मा
देशातील पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सरकारी नोकरी करूनही आपला स्वतंत्र ठसा उमटवला. आपल्या बाणेदारपणाला दाबू पाहणार्या पुरूषप्रधान संस्कृतीलाही त्यांनी झुकवले. जे पटले तेच केले. कायद्याच्या आधीन राहून त्याची अंमलबजावणी करण्याचा नवा मार्ग त्यांनी घालून दिला. 'लोक काय म्हणतील' याचा कधी विचार केला नाही. म्हणूनच एका क्षणी आपल्याला डावलले जाते आहे नि आपल्या कार्यालाही मर्यादा येत आहेत हे जाणवल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीही सोडून दिली. सध्या समाजकारणात सक्रिय असणार्या किरण बेदींविषयी जाणून घेऊ त्यांच्याच शब्दात.....
प्रश्न : आयपीएस अधिकारी म्हणून आपली निवड झाली, तेव्हा कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती?
किरण बेदी : आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली तेव्हा महिलांनी पोलीस सेवेत रूजू होण्यास समाजाचा विरोध होता. परंतु, माझे कुंटुंब समाजाच्या विरोधात होते. म्हणूनच तर मी या पदाला न्याय देऊ शकली. परंतु, आजही समाजात काही जुन्या विचारांचे लोक आहेत याची खंत वाटते.
प्रश्न : आपल्या यशस्वी प्रवासात आपल्या पतीचे योगदान असेलच?
किरण बेदी : होय, माझ्या प्रत्येक यशात माझ्या पतीचे मोठे योगदान होते. माझे यश ते आपले यश समजतात.
प्रश्न : 'आप की कचहरी' या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत असताना कसा अनुभव आला?
किरण बेदी : या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एक सामाजिक गरज लक्षात आली, ती म्हणजे देशाला आज अशा प्रकारच्या फोरमची आवश्यकता आहे. जनतेला तत्काळ न्याय पाहिजे. जनतेला अशी व्यवस्था हवी आहे की, ती मदत करु शकेल. आज 'आप की कचहरी' हा कार्यक्रम सामान्य जनतेला न्याय देण्याचे एक माध्यम बनले आहे.
प्रश्न : भारतीय न्यायप्रणाली सुस्त झाली असून अनेक प्रकरणे वर्षांनुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत, याबाबत काय वाटते?
किरण बेदी : हे वास्तव आहे, की न्यायालयात प्रकरणे अनेक वर्षांपासून धुळ खाताहेत. लोकांचे अर्धे आयुष्य 'तारीख पे तारीख'मध्ये निघून जात असते. सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केले आहे. जनतेचा आता न्याय व्यवस्थेवरील विश्वास लोप पावत आहे. त्यांना न्याय मिळेल किंवा नाही अशी साशंकता त्यांना वाटत असल्याने जनता दुसरा मार्ग निवडत असते. परंतु, त्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागत नाही. तसे पाहिले तर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून सुनावणी करणार्या न्यायाधीशांची संख्या त्या प्रमाणात खूपच कमी आहे. परिणामी प्रकरणे प्रलंबित आहेत. जनतेत सध्या लोक न्यायालयाची लोकप्रियता वाढत आहे.
प्रश्न : आपल्या प्रयत्नातून तिहार तरूंग हा आश्रमात परिवर्तित जाला. देशातील इतर तुरूंगाची अवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल ?
किरण बेदी: 'तिहार तुरूंग' आता 'तिहार आश्रम' म्हणून ओळखले जातो आहे. देशातील प्रत्येक तुरूंगाचे आश्रमात रूपांतर होऊ शकते. यासाठी
स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन या कार्यात सहकार्य केले पाहिजे. स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने एकत्र येऊन कार्य करतील त्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. कैद्यांना शिक्षेसोबत स्वावलंबनाचे धडे देऊन त्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. असे केल्याने त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश लावण्यास मदत होईल.
प्रश्न : महिला सबलीकरणात अडथळे काय आहेत?
किरण बेदी : भारतीय महिलांचे स्वातंत्र्य कुटुंबाकडून हिरावून घेतले जात आहे. त्यांना कुटुंबातूनच हीन वागणूक दिली जाते. गावापासून शाळा दूर असल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात नाही. महिलांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही त्यांना शिकवले जात नाही. नोकरी करण्याची इच्छा असून ती घराच्या चौकटीबाहेर पडू शकत नाही. अशा अनेक कारणांमुळे महिला मागे आहेत. घरातील कामकाज आवरण्यातच तिचे सारे आयुष्य निघून जात आहे. महिलांनी घराची चौकट पार करून विधायक कार्य केले पाहिजे तरच समाजाची उन्नती होईल.
प्रश्न : आपण राजकारणात का आल्या नाहीत?
किरण बेदी : मला राजकारणात रूची नाही. पब्लिक लाईफ हा माझा आवडता विषय आहे. सामान्य नागरिकांमध्ये रमायला आवडते. त्यांचे दु:ख, समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. राजकारणात मला मुळीच रस नाही व भविष्यात ही नसेल.