हिंदी चित्रपटांसाठी गाण्याची इच्छा - मिल्कित सिंह
'तुतक तुतक तुतिया' गीत अजूनही लोकप्रिय
पंजाबी अल्बमच्या माध्यमातून आपल्या आवाजाची मोहिनी घालणारे सुप्रसिद्ध पंजाबी गायक मिल्कित सिंह यांच्याशी 'वेबदुनिया'च्या प्रतिनिधीने थेट संवाद साधला. दिलखुलास गप्पा मारताना त्यांनी आपल्या काही आठवणींना उजाळा देत मनोदय व्यक्त केला.
प्रश्न :- आपल्या चाहत्यांसाठी कोणता नवीन अल्बम घेऊन येत आहात?
उत्तर :- याच महिन्यात माझा नवीन अल्बम रिलीज होत आहे. मुंबई व न्यूयार्कमध्ये याचे शूटिंग झाले आहे. या
अल्बममध्ये दहा गाणी आहेत. माझ्या चाहत्यांना याची उत्कंठा लागून राहिली आहे, हे मी जाणतो. भारतात हा अल्बम
दहा ऑक्टोबरपर्यंत रिलीज होईल.
प्रश्न :- पॉप गायक म्हणून आपण प्रसिद्धी मिळवली आहे. पण, तुम्ही कधीच चित्रपट अथवा गझल गायकीमध्ये रस
दाखवला नाही, ते का?
उत्तर :- खरे सांगायचे झाले तर मला यामध्ये रस आहे. पण, आतापर्यंत मी लंडनमध्ये राहिलो. त्यामुळे हिंदी
चित्रपटासाठी गाणे मला शक्य नव्हते. मी हिंदी चित्रपटासाठी गायचे म्हटले तर मला काही काळ तरी भारतात राहावे लागेल. याबाबत सध्या मी विचार करत आहे. न्यूयॉर्कमध्ये शूटिंग होत असलेल्या एका इंग्रजी चित्रपटासाठी मी गायलो आहे.
प्रश्न :- चित्रपट गीत आणि अल्बमच्या गाण्यांमध्ये नेमका फरक काय ?
उत्तर :- चित्रपट आणि अल्बमच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये फारसा फरक नसतो. गायकाला सारखीच मेहनत करावी लागते.
पण, चित्रपटातील गाणी गाताना दुप्पट उत्साह असतो. चित्रपटासाठी गातो तेव्हा प्रेक्षकांची संख्या मोठी असते. याउलट अल्बम खासगी स्वरूपात म्हणजे पंजाबी लोकांपुरताच मर्यादित राहतो.
प्रश्न :- हिंदी चित्रटासाठी गाण्याची संधी मिळाल्यास कोणत्या कलाकारासाठी गाण्यास आवडेल?
उत्तर :- हे तर त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. बॉलीवूडमधील अनेक निर्मात्यांशी संपर्क येतो. १९८७ मध्ये माझा पहिला पंजाबी अल्बम रिलीज झाला. तेव्हापासून मी मुंबईतील सर्व स्टुडियोमध्ये काम केले आहे. उत्तम व आदेश यांच्या समवेतही मी काम केले आहे.
प्रश्न :- तुमचं कोणतं गाणं सर्वाधिक लोकप्रिय झालं?
उत्तर :- मी जवळजवळ 36 देशांत गाण्यासाठी जोतो. तेथे मी वेगवेगळी गाणी सादर करतो. तरीही 'तुतक, तुतक
तुतिया' हे एकमेव गाणे असे आहे की, याची जादू अजूनही आहे. हे गाणे माझ्याही आवडीचे आहे. श्रोत्यांच्या फर्माईशीमुळे हे एकच गाणे मला तीन चार वेळा म्हणावे लागते.