चॅंपियन्स करंडक या तीन अंकाच्या नाटकातील पहिला अंक संपला. पहिल्या अंकात विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असलेले भारत, श्रीलंका आणि यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ बाहेर पडला. शुक्रवारपासून (ता.दोन) दुसरा अंक सुरु होत असून शेवटच्या अंकात विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हे समजणार आहे.
चॅंपियन्स करंडकमध्ये लाखो क्रिकेट प्रेमींचे काळीज असणारा भारतीय संघ उपात्यंफेरी गाठू शकला नाही. याबद्दल सर्वांना रुखरुख लागली. भारतीय संघाच्या अपयशाला खेळाडूंच्या कामगिरीप्रमाणे नशीबही जबाबदार आहे. स्पर्धेच्या सुरवातीपासून भारताला धक्के बसत राहिले ते शेवटपर्यंत बसले. यामुळे पिंजरा या चित्रपटातील सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताच्या ओळी आठवतात...
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !
चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या पूर्वीपासून नशीब भारतीय संघाच्या बाजूला नव्हते. टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि स्टार गोलंदाज झहीर खान दुखापतीतून सावरु शकले नाही. यामुळे दोघ स्टार खेळाडूंना अनिच्छेने वगळून भारतीय संघ जाहीर करावा लागला. त्यातच गौतम गंभीरची दुखापत चिंतेचा विषय बनली. पहिल्या सामन्यात तो त्यातून सावरल्याने भारतीय संघाने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु समस्यांनी भारतीय संघाचा पिच्छा सोडला नाही. धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याच्या बोटाला सराव करताना दुखापत झाली. त्याला सहा आठवड्याची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच त्याला मायदेशी परतावे लागले. यामुळे फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला सेहवाग, युवराज आणि हुकमी गोलंदाज झहीर खानला सोडून भारताला खेळावे लागले. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धांमधील इतिहास भारताच्या बाजूने होता. परंतु प्रत्यक्ष सामन्यात त्याची पुनरावृत्ती यावेळी होवू शकली नाही. भारतीय संघाची सुमार गोलंदाजी आणि त्यानंतर लौकिकाला साजेशी फलंदाजी न झाल्याने पराभव पत्करावा लागला. यामुळे यानंतरचे दोन्ही सामने जिंकणे भारतीय संघासाठी आवश्यक झाले. परंतु दुसर्या सामन्यात पुन्हा नशिबाची वक्रदृष्टी भारतीय संघाकडे वळली. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना पावसाचे आगमन झाले. हा सामना रद्द करुन दोन्ही संघाना एक, एक गुण बहाल करण्यात आला. पर्यायाने उपात्यंफेरीत पोहचण्याच्या भारताच्या आशा पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या सामन्याकडे केंद्रीत झाल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभवच भारताला उपात्यंफेरीत पोहचू शकला असता. सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ चार बाद 157 अशा मजबूत परिस्थितीतून आठ बाद 187 धावांवर घसरला. यावेळी भारताच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या. परंतु आठव्या क्रमांकाच्या जोडीने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून भारताला स्पर्धेबाहेर ढकलले. यावेळी पुन्हा नशिबाने भारतीय संघाला धोका दिला. शेवटी वेस्ट विडींजविरुद्धचा सामना जिंकला असला तरी उपात्यंफेरीत भारताला तो पोहचू शकला नाही. या सामन्यातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बाहेर पडला होता. परंतु विडींजचा दुबळा संघ असल्याने त्याचा फटका टीम इंडीयाला बसला नाही, इतकेच एक सुदैव!जून महिन्यात झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही भारतीय संघ उपात्यंफेरी गाठू शकला नव्हता. आता मिनी विश्वकरंडक म्हणून ओळखल्या जाणार्या चॅंपियन्स करंडकमध्ये उपात्यंफेरी गाठण्यात भारताला अपयश आले. यामुळे आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकाकडे वाटचाल करणारा भारतीय संघ क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला.आपले मत खालील चौकटीत नोंदवा