Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कैरीचं पन्हं

कैरीचं पन्हं

वेबदुनिया

MH GOVT
निसर्गाने कात टाकायला सुरुवात केली की चैत्राची चाहूल लागते. शिशिर ऋतुतल्या पानगळीनं तर वसंतात निसर्ग पुन्हा रंग - गंधाची उधळण करायला लागतो. या रंग-गंधात आंब्याच्या हिरव्यागार पानांना लटकणाऱ्या हिरव्याकंच कैऱ्यांचा वाटाही मोठा असतो. कारण या कैऱ्यांचा आंबटपणा वासासहित वातावरणात मिसळलेला असतो. या आंबटपणाची चव घ्यायला प्रत्येकजण उत्सुक असतो. लहान मुलं तिखट-मीठाबरोबर कैरीचे तुकडे खावून या आंबटपणाची चव घेतात. तरी या कैरीचा गोडवा खऱ्या अर्थाने मुरलेला असतो, तो पन्ह्यातचं. कैरी आणि गुळाची आंबटगोड चव म्हणजे क्या बात है ! म्हणूनच चैत्र लागला आणि कैरीचं पन्ह केलं नाही, असं सहसा होत नाही. जणू चैत्रात एकीकडे उन्हाची तल्खली वाढत असताना दुसरीकडे शांततेचा-सावलीचा-गारव्याचा अनुभव पन्‍ह देतं.

हे पन्ह करण्याची पध्दत एकदम सोपी आहे. हिरव्यागार कैऱ्या घ्यायच्या. त्या कुकरमधून वाफ वून किंवा पाण्यात शिजवून घ्यायच्या. शिजल्यावर सालं काढून त्याचा गर एका भांड्यात जमा करायचा. हा गर चांगला घोटून घ्यायचा, मिक्सरमध्ये बारीक करायचा किंवा गाळणीतून चांगला. गाळून घ्यायचा. नंतर जमलेल्या गराच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून हे मिश्रण पुन्हा चांगलं घोटायचं. घोटतानाच त्यात वेलचीपूड टाकायची. हे सर्व मस्त एकजीव झालं की चवीपुरतं मीठ टाकून, आवश्यक तेवढं पाणी टाकून ढवळायचं.

असं थंडगार पन्हं प्यायल्यावर त्याची गुळमट चव जिभेवर रेंगाळली पाहिजे, तर ते खरं पन्हं.

पूर्वी उन्हाळ्यात किंवा कैऱ्यांचा सिझन असेपर्यंत रोज घरोघरी पन्हं केलं जायचं. कारण ताज्या कैऱ्यांपासून केलेल्या ताज्या पन्ह्याची लज्जत न्यारीच असते. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत रोज पन्ह्याचा घाट घालणं शक्य नाही. तेव्हा एकदाच भरपूर कैऱ्या आणून त्या शिजवून त्यांचा गर काढून त्यात योग्य प्रमाणात गूळ किंवा साखर टाकून त्याचं मिश्रण गरम करुन बाटलीत भरुन ठेवायचं. नंतर जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा गर, पाणी आणि चवीला मीठ टाकून हवं तेव्हा पन्ह तयार करु शकतो.

विशेष म्हणजे नुसती कैरी खाल्ली तर ती बाधू शकते. परंतु कैऱ्या उकडून केलेलं पन्हं बाधत नाही, उलट प्रकृतीसाठी हितकारक ठरतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi