Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

शिवभारत अध्याय सत्ताविसावा

शिवभारत अध्याय सत्ताविसावा
, मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (13:00 IST)
पंडित म्हणाले :-
स्वतः ठेवलेल्या सैन्यामुळें अजिंक्य अशा पन्हाळगडांहून तो ( शिवाजी ) सहाशें पदातींसह न कळत निघून गेल्याचें योगमायेनें गूढ झालेल्या जोहरास कसें समजलें व आपल्या सेनेच्या बळावर त्यानें कोणता प्रतीकार केला तें सर्व, वीर शिवाजीच्या यसोरूपी क्षीरसागरांत पोहणार्‍या परमानंदा, त्वां सांगावें. ॥१॥२॥३॥
कवींद्र म्हणाला :-
जेव्हां शिवाजीनें स्वतः पन्हाळगडाहून जाण्याची इच्छा केली, तेव्हां त्यानें वीर जोहरास असा निरोप पाठविला. ॥४॥
शिवाजी म्हणाला :-
आदिलशहानें बोलावलेले व माझ्या अतिक्रमणामुळें रागावलेले मोगल माझा देश आक्रमूं लागले आहेत. ॥५॥
म्हणून त्यांच्याशीं युद्ध करण्यासाठीं आतां मी येथून निघत आहें. तेव्हां तूं माझ्या युद्धनिपुण योद्ध्यांशीं येथें लढावेंस. ॥६॥
किंवा जर माझ्याशीं मजेनें - कौतुकानें द्वंद्वयुद्ध करण्याची तुझी आज इच्छा असेल, तर पन्हाळगडाच्या पायथ्याशीं यावें. ॥७॥
स्वतःचीं सैन्यें आम्हाला दुरून पाहात असतां आपण दोघेहि खङ्ग घेऊन तेथें आनंदानें लढूं ! ॥८॥
त्या कर्णूलच्या कुशल अधिपतीनें ( जोहरानें ) तो संदेश ऐकूनहि, मन भयचकित झाल्यामुळें, न ऐकल्यासारखें केलें. ॥९॥
तेव्हांपासून त्यानें भायीखानादि योध्द्यांना त्या गडास सर्व बाजूंनीं कडेकोट वेढा देण्यास आज्ञा केली. ॥१०॥
मग मुंगीसुद्धां न कळतां बाहेर जाणार नाहीं किंवा आंत येणार नाहीं अशा रीतीनें जोहराच्या सैनिकांनीं तेथें वेढा दिला. ॥११॥
तेथें ( वेढा देऊन ) बसलेल्या त्या शत्रुयोध्द्यांना जणूं काय आंधळे करून शिवाजी स्वशौर्यानें तो वेढा फोडून गेला. ॥१२॥
नंतर त्यानें खरोखर सात प्रहरांत पांच योजनें ( ४० मैल ) मार्ग आक्रमून विशाळगड गांठला. ॥१३॥
मग ती बातमी जाणणार्‍या हेरांनीं शिवाजी पन्हाळगडावरून निघून गेला असें जोहरास सांगितलें. ॥१४॥
तेव्हां जणूं काय प्रलयकाळच्या सागरांतील भोंवर्‍यांत सांपडलेला तो जोहार स्वतः अत्यंत व्यामूढ होऊन सभेमध्यें खिन्न झाला. ॥१५॥
अहो ह्या गडावर आम्ही कोंडलेला हा शत्रु आम्हास चकित करून आज येथून अकस्मात् निघून गेला यास काय म्हणावें ! ॥१६॥
आतां मी आदिलशहास तोंड कसें दाखवूं ? यापुढें माझें जिणें केवळ उपहासास कारणीभूत होय. ॥१७॥
यवनांचा नाश करणारा हा माझ्या हातून निसटलेला ऐकून शाएस्ताखानादिसुद्धां मला काय म्हणतील ! ॥१८॥
असा पुष्कळ वेळ पश्चात्ताप करून व वारंवार विचार करून तो अतिमत्त अशा वीर सिद्धी मसूदास म्हणाला. ॥१९॥
जोहर म्हणाला :-
गांठींतील ( थैलींतील ) रत्नाप्रमाणें आतां हा शत्रु वेढ्यांतून निसटल्यामुळें माझ्या मनास किती तरी दुःख होत आहे ! ॥२०॥
आम्ही सगळे पाहात असतांना जो आज आमच्या हातांतून निसटला त्याचा, हे महाबाहु मसूदा, शीघ्र पाठलाग कर. ॥२१॥
आपल्या दुसर्‍या कार्यामध्यें व्यग्र असलेला तो ( शिवाजी ) विशाळगडावर फार वेळ राहणार नाहींच, म्हणूण तूं त्वरा कर. ॥२२॥
याप्रमाणें त्यानें आज्ञा केल्यावर तो शौर्यकर्मामध्यें असामान्य ( मसूद ) मोठ्या सेनेसह त्या शत्रूचा पाठलाग करूं लागला. ॥२३॥
चिखलाळ मार्गांत त्याचे घोडे गुडघ्यापर्यंत रुतले व पदातीसुद्धां दाट शेवाळ्यामध्यें पडले. ॥२४॥
मसूद आलेला ऐकून त्या गडावर राहणारा पराक्रमी शिवाजी राजा लढण्यास चांगला सिद्ध झाला. ॥२५॥
पल्लीवनाचा ( पालीचा ) राजा वीर जसवंतराव, शृंगापूरचा राजा प्रतापी सूर्याजीराव आणि दुसरेहि सामंत, त्या गडास वेढण्याच्या कामीं त्या दुरात्म्या दुष्ट जोहरानें पूर्वीच नेमले होते; ते वारंवार लढत असतांहि पदोपदीं पराभूत झाल्यामुळें गडावर चढणार्‍या शिवाजीस अडवूं शकले नाहींत. ॥२६॥२७॥२८॥
त्या सगळ्याच गर्विष्ठ राजांनीं, त्या अभिमानी व ससैन्य समूदास मिळून त्या गडास पुनः वेढा दिला. ॥२९॥
नंतर क्रोधानें डोळे लाल झालेले असे ते शिवाजीचे योद्धे त्या गडावरून खालीं उतरून मेघाप्रमाणें गर्जना करीत धावून जाऊन सावधपणें वेढा देणार्‍यांवर हल्ला करून, उड्या वालून तीक्ष्ण तरवारींनीं कापून काढले. ॥३०॥३१॥
तेथें पुष्कळ शिद्यांस शिवाजीच्या बलाढ्य पायदळांनीं तरवारीच्या धारांनीं कापून काढल्यामुळें त्यांनीं यमपुरीची वाट धरली. ॥३२॥
तेथें जसवंतराव, सूर्याजीराव व दुसरेहि पुष्कळ सामंत त्यांचा मारा सहन करूं शकले नाहींत. ॥३३॥
पळून जाणार्‍या त्या आपल्या सैन्यास परतवून, वेगवान मसूदानें, ग्रह ग्रहांवर हल्ला करतो त्याप्रमाणें, शत्रूंवर हल्ला केला. ॥३४॥
तेव्हां तरवारींनीं व शक्तींनीं एकमेकांस जोरानें मारणार्‍या त्या दोनहि सैन्यांमध्यें मोठें युद्ध झालें. ॥३५॥
तेव्हां बाहुबलाच्या गर्वानें उन्मत्त झालेल्या व विघ्नाप्रमाणें चालून आलेल्या शिद्यांना युद्धनिपुण शत्रूंनीं ( मराठ्यांनीं ) लोळविलें. ॥३६॥
विद्युद्युक्त मेघ वृक्षांना मोडून व गरुड सापांना पकडून गर्जना करतात, त्याप्रमाणें शिवाजीच्या पदातींनीं त्यांना जिंकून गर्जना केली. ॥३७॥
त्या वेळीं फुटलेलीं शिरस्त्राणें, तुटलेले हात, पाय मस्तक, खांदे, मांड्या हीं त्या रणभूमीवर सर्वत्र पसरलेलीं होतीं. ॥३८॥
कोंवळ्या गवतानें अत्यंत हिरवीगार असलेली ती विशाळगडाच्या लगतची भूमि शत्रूकडील वीरांच्या रक्तानें एकदम लालभडक झाली. ॥३९॥
माणसें व घोडे यांच्या मांड्या, गुडघे, जंघा, पाय व डोकीं यांच्यायोगें भूमि हिडिस दिसूं लागली. ॥४०॥
याप्रमाणें आपलें सगळें सैन्य आपल्या हातानें शिवाजीच्या क्रोधसमुद्रांत बुडवून लज्जित झालेला मसूद युद्धपारंगत शत्रूंनीं अनपेक्षितपणें जिवंत सोडला व त्यास पराकाष्ठेचा खेद होऊन तो शत्रूंपासून पराड्मुख झाला. ॥४१॥४२॥
त्या युद्धांतून पळून येऊन आपणासमोर उभा राहिलेला तो ( मसूद ) जणू काय परलोकाहून आला आहे असें जोहरास वाटलें ! ॥४३॥
नंतर आपल्या प्रातांच्या सीमेहून पूर्वीच आणवून ठेवलेलें सैन्य घेऊन तो स्वतः विशाळगडाहून निघाला. ॥४४॥
आनंददायक मार्गांत निरनिराळ्या पांचसहा वस्ती करून राजगडच्या ( शिव ) राजानें लगेच राजगडास जाऊन, चमकणार्‍या किरणसमूहाच्यायोगें लखलखणार्‍या रत्नजडित आसनावर बसलेल्या, कुलीन स्त्रियांनीं परिवेष्टित असलेल्या, कुलीन स्त्रियांचें कुलदैवत झालेल्या, नाना प्रकारचीं व्रतें करणार्‍या, रात्रंदिन दैवतांची पूजा करणार्‍या, निरनिराळे आशीर्वाद देणार्‍या, सत्य व गंभीर भाषण करणार्‍या, आनंदाश्रुपुरानें दीर्घ नेत्र स्तिमित झालेल्या, अंतःकरणांत पुत्रप्रेम उचंबळलेल्या, दर्शनोत्सुक झालेल्या, स्तनांतून वाहणार्‍या अमृतमय दूग्धधारांनीं न्हाऊं घालणार्‍या आपल्या जननीस वंदन केलें. ॥४५॥४६॥४७॥४८॥४९॥
नंतर निरनिराळ्या प्रकारचा सर्व वृत्तांत सांगण्यांत त्या विजयी शिवाजीनें तो सर्व दिवस तिच्यासंनिध घालविला. ॥५०॥
जेव्हां विजयी ( शिवाजी ) राजा आपल्या राजगडास आला, तेव्हां दुंदुभि मृदु व गंभेर ध्वनीनें वाजूं लागल्या. ॥५१॥
तेथील शिद्यांच्या सैन्याचा आपल्या बाहुबलानें तत्काळ पराभव करून शिवाजी राजा पन्हाळगडाहून आपल्या राजधानीस ( राजगडास ) आला. तेव्हां सगळें सैन्य बरोबर असून व निरनिराळ्या प्रयत्नांमध्यें तें व्यग्र असून सुद्धां दिल्लीपतीच्या मामास ( शाएस्ताखानास ) आपला इष्ट हेतु सिद्धीस जातो कीं नाहीं याविषयीं संशय उत्पन्न झाला. ॥५२॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवभारत अध्याय सव्विसावा