मुलाच्या जन्मानंतर त्याची काळजी घेणे हे त्याच्या आईसोबत इतरांचेही काम असते.त्यामुळे आपल्या चिमुकल्याला थोडे समजायला लागल्यानंतर त्याला वरचे खायला द्यायला सर्वच डॉक्टर सांगतात आपणही त्याला पेच, फळांचा ज्युस यांच्याबरोबर पूरक आहार देण्याची गरज आहे.
सहाव्या महिन्यापासून एक वर्षापर्यंत बाळाला पूरक आहार देण्यासंदर्भात सविस्तर माहिती आईला असायला हवी. पहिला वाढदिवस साजरा करण्याआधी सहा महिने पूर्ण होताच अर्धा वाढदिवस साजरा करावा. याच वेळी आपल्या संस्कृतीत सोळा संस्कारांपैकी उष्टावनाचा पहिला संस्कार सांगितला आहे. याला वैद्यकीय उष्टावनाचे स्वरूप द्यायचे झाल्यास या दिवसापासून बाळाला वरचे अन्न भरवण्यास सुरूवात करावी. आधी वरचे पूरक अन्न, मगच आईचे स्तनपान हा महत्त्वाचा बदल बाळाच्या सवयीमध्ये आईला घडवून आणायचा आहे.
आधी दूध पाजले आणि मग खाऊ घातले तर दुधाने बाळाचे पोट भरेल आणि ते अन्न जास्त घेणार नाही. आदर्श पूरक आहाराचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तो घरगुती अन्नापासून बनवलेलाच असावा. बिस्किटे किंवा बाजारातून विकत आणलेले डबाबंद पदार्थ बाळाला कधीच देऊ नयेत. आपण रोज जे अन्न खातो त्यापासूनच बाळाचे अन्न तयार करावे. हा पूरक आहार पातळ नसावा, तर घट्ट असावा. सूप, भाताची पेज, कांजी, डाळीचे पाणी, फळांचा रस, असे पातळ पदार्थ देऊ नयेत. या पातळ पदार्थांत पाणी जास्त व ताकद कमी असते.