Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंग इज किंग

सिंग इज किंग
नवी , मंगळवार, 22 जुलै 2008 (22:50 IST)
WD
केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने अखेर सगळे अंदाज आणि डावपेचांना खोटे ठरवत तब्बल १९ मते जादा मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकला. सरकारच्या बाजूने २७५ मते पडली तर डावे, भाजप आणि इतर पक्ष एकत्र येऊनही त्यांना केवळ २५६ मते मिळवता आली. दोन खासदार तटस्थ राहिले. या मतदानासाठी एकेका खासदारासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात असतानाही तब्बल ९ खासदार अनुपस्थित राहिले. डावे, भाजप आणि मायावती या सगळ्यांना धोबीपछाड देत अखेर डॉ. मनमोहनसिंग हेच 'किंग' ठरले.

अणू कराराच्या मुद्यावरून डाव्या पक्षांनी पाठिंबा काढल्यानंतर सरकार अल्पमतात आले होते. डावे तसेच भाजपनेही सरकारने विश्वासमत सिद्ध करून दाखवावे असे आव्हान दिले होते. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना डाव्यांनी पाठिंबा काढून घेण्याचे पत्र दिल्यानंतर त्यांनीही सरकारला बहूमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज हे मतदान घेण्यात आले.

सरकारच्या सहाय्यासाठी समाजवादी पक्ष धावून आला तरी सरकारला बहूमत प्राप्त करण्यासाठी बरीच उठाठेव करावी लागणार होती. पण मतदान झाल्यानंतर मात्र जे चित्र दिसले ते खूपच वेगळे दिसले. सरकारने तब्बल १९ मते जास्त मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिवाय ५४१ पैकी ८ खासदार अनुपस्थित राहिले. त्याचाही फायदा सरकारला मिळाला. अर्थात ते उपस्थित राहिले असते तरीही सरकारने हा ठराव जिंकला असताच, हे आकडेवारीहूनही स्पष्ट होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi