Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहूल गांधींच्या भाषणातून डोकावला विदर्भ

राहूल गांधींच्या भाषणातून डोकावला विदर्भ

वेबदुनिया

नवी दिल्ली , मंगळवार, 22 जुलै 2008 (14:47 IST)
कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी नुकत्याच विदर्भात केलेल्या दौर्‍यातील निरिक्षणांचा संदर्भ देऊन विजेचा प्रश्न आणि अणू करार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. पण राहूल यांचे हे भाषण बंद पाडण्याची संधीही विरोधकांनी साधली नसती तरच नवल. त्यामुळे वैतागलेल्या सभापती सोमनाथ चटर्जी यांनी 'भारतीय संसद अतिशय खालची पातळी गाठत असल्याची टीका करत 'मधली सुटी' घेत असल्याचे जाहीर केले.

राहूल यांचे भाषण ऐकण्यास कॉंग्रेसजन आणि विरोधकही उत्सुक होते. पण त्याचवेळी त्यांचे भाषण सुरू असताना कॉमेंट्स करण्याची संधीही त्यांनी साधली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांची खडाजंगी होऊन अखेर वैतागलेले सभापती सोमनाथ चटर्जी यांनी सभागृह संस्थगित केले.

राहूल यांनी भाषणात विदर्भात आलेला अनुभव सांगून विजेचा प्रश्न आणि अणू कराराची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की मी काही दिवसांपूर्वी विदर्भात गेलो होतो. तिथे मला शशिकला ही महिला भेटली. तिला तीन मुले होती. हे कुटुंब भूमीहीन होते. तिला साठ रूपये रोज व तिच्या पतीला ९० रूपये रोज मिळतो. त्यांना तीन मुले आहेत. ती एका खासगी शाळेत जातात. त्यातील मोठ्याला कलेक्टर, मधल्याला डॉक्टर आणि लहान्याला खासगी कंपनीतील नोकरी मिळवायची होती. मग मी शशिकलला विचारले, या मुलांचे स्वप्न पूर्ण होईल काय? तिने ठामपणे होय असे उत्तर दिले. मी त्यांच्या घराबाहेर पडलो, तेव्हा पाहिलं, घरात वीज नव्हती. मी त्या मुलांना विचारले, मग तुम्ही अभ्यास कसा करता. त्या मुलांनी एक पितळी दिवा आणून दाखवला. आम्ही याच्या प्रकाशावर अभ्यास करतो. थोडक्यात विजेचा प्रश्न आपल्या पुढच्या पिढीवर परिणाम करणारा ठऱला आहे. उर्जेच्या कमतरतेचा संबंध सगळ्या क्षेत्रांशी आहे. तो सामान्यांच्या जीवनाशी तर आहेच, पण आपल्या औद्योगिक क्षेत्राशीही संबंधित आहे. भारताच्या प्रगतीच्या वेगावरही त्याचा परिणाम होतो. आपण नऊ टक्के विकासदर गाठला तोही या उर्जेच्याच आधारे. त्यामुळे ही उर्जा नसेल तर प्रगतीच ठप्प होईल.''

राहूल यांनी या भाषणात कलावती या महिलेसंदर्भात आलेला अनुभवही सांगायला सुरवात केलेली असतानाच विरोधकांनी गोंधळ घालून त्यांचे भाषण बंद पाडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi