Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ग्लोबल वॉर्मिंग'चे भारतावरील परिणाम

'ग्लोबल वॉर्मिंग'चे भारतावरील परिणाम

वेबदुनिया

, मंगळवार, 8 डिसेंबर 2009 (16:52 IST)
ND
ND
भारताची विकासाच्या दिशेने गतीने वाटचाल होत असताना वातावरणीय बदल (ग्लोबल वॉर्मिंग) मात्र आपली वाट अडवून उभे आहेत. विकास आणि पर्यावरणीय बदलाचे व्यस्त प्रमाण भारतासाठी अडचणीचे ठरत आहे.

विकासाचा संबंध हा प्रामुख्याने औद्योगिकरणाशी घातला जातो आणि जीवनमान सुधारणे याचा अर्थ जीवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे असा घेतला जातो. या सगळ्याच विकास असे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. या विकासापोटी अनेक नैसर्गिक स्त्रोतांवर कुर्‍हाड कोसळली आहे. शेती, पाणी, जंगल या सगळ्यांना विकासाने गिळंकृत केले आहे.

विकासाच्या मार्गावर चालत असताना पर्यावरणात होत असलेल्या या बदलाचे परिणामही दिसू लागले असून निसर्ग आता या बदलांच्या रूपाने आपल्यावर सूड उगवत आहे.

विकासाच्या मार्गावर धावायचे असेल तर औद्योगिकरण हवे. या औद्योगिकरणासाठी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.गाड्यांपासून मोठमोठे कारखाने इंधनावर चालतात. सिमेंटची जंगले उभारण्यासाठी नैसर्गिक जंगलांची कत्तल केली जाते. विजेसाठीही कोळसा जाळावा लागतो, नाही तर पाणी चक्रात घालून तिची निर्मिती करावी लागते. या सगळ्यातून व्यय होणार्‍या वायूने आता अवघ्या जगाला कवेत घेतले आहे.

जगाचे तापमान त्यामुळेच वाढतेय. पण तेवढेच घडते आहे असे नाही. शेती आणि ग्रामीण विकासावरही याचा मोठा परिणाम होतो आहे, हे आत्ताच लक्षात घेतले पाहिजे. निसर्गाचे चक्र तर बदलतेच आहे. म्हणूनच उष्ण वारे वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. वादळे, पूर सातत्याने येऊ लागले आहेत. याचा प्रामुख्याने परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे.

विशेषतः भारतात पर्यावरणीय बदलाचे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. भारत २०४५ पर्यंत जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे. तोपर्यंत आपण जागे न झाल्यास पर्यावरणीय बदलांनी भारतावर मोठे परिणाम घडविलेले असतील.

सरकारच्या नॅशनल कम्युनिकेशन्स (नॅटकॉम ) या संस्थेने या परिणामांचा अभ्यास केला असून त्यात पुढच्या काळात काय होईल याचे चित्र मांडले आहे. ते वाचले तरी त्यातली भयावहता दिसून येईल.

गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या पात्राच्या आरंभाशी असलेला बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळेल. या दोन्ही नद्यातील सुमारे सत्तर टक्के पाणी हे एरवी बर्फ वितळूनच येत असते. ते एकाच वेळी वितळल्याने बर्फाखालचे डोंगर उघडे पडतील आणि या नद्यांचे पाणी एकत्रितरित्या वाहून जाऊन समुद्राची पातळी वाढेल.

मॉन्सूनचा बेभरवशीपणा वाढेल. त्याचे परिणाम मॉन्सून आधारीत शेतीवर होतील. नद्यांवरही होतील. सहाजिकच पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा तुटवडा भासेल.

गव्हाच्या उत्पादनात चार ते पाच दशलक्ष टनांनी कपात होईल.

तापमान किमान एक अंश सेल्सियसने वाढेल.

बर्फाच्छादित प्रदेश वितळल्याने समुद्राची पातळी वाढेल. परिणामी समुद्रकिनारी दाट वस्ती असलेल्या देशांना मोठा फटका बसेल. त्यामुळे मुख्य भूमीवर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल. समुद्राकाठची मॅनग्रोव्ह जंगले नष्ट होतील.

पूर येण्याचे प्रमाण आणि त्याच्या तीव्रतेतही वाढ होईल. किनार्‍यालगत रहाणार्‍या लोकांना याचा मोठा त्रास होईल.

या नैसर्गिक बदलाचा मोठा परिणाम देशातील जंगलांवर होऊन त्यांचे प्रकारच बदलतील. त्यांची जैवविविधता संकटात येईल. सहाजिकच जंगलातील झाडांकडून मिळणारी फूल-फळादी उत्पादनावर परिणाम होईल.

या सगळ्या गोष्टी जपण्यासाठी आपल्याला आत्ताच योग्य ते उपाय करायला हवेत. अन्यथा आपला भविष्यकाळ आपल्या हातातून निसटून जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi