सावधान! हिमनद्या वितळताहेत!
काठमांडू , सोमवार, 7 डिसेंबर 2009 (15:41 IST)
आशिया खंडातील जवळपास एक अब्ज लोक पाण्यासाठी हिमालयातील हिमनद्यांवर अवलंबून आहेत. पण या सगळ्यांसाठी धोक्याचा इशारा आहे. या हिमनद्या वितळत असून त्यांचा वेगही वाढला आहे. अर्थात, जागतिक तापमानवाढीमुळेच हे घडतेय. त्यामुळे आगामी काळात या नद्यांवर अवलंबून असणार्या प्रदेशात दुष्काळ पडल्यास आश्चर्य वाटायला नको. हिमालयातील हिमनद्यांचा परिसर जवळपास २४०० किलोमीटरचा आहे. या क्षेत्रात पाकिस्तान, भारत, चीन, नेपाळ आणि भूतान हे देश मोडतात. आशियातील नऊ नद्यांना या हिमनद्यांतून पाणी पुरवले जाते त्यामुळे या नद्यांच्या पात्रात रहाणार्या एक अब्जाहून अधिक लोकांचे जीवन अवलंबून आहे. पण गेल्या तीस वर्षांत दर दशकाला हिमालयातील प्रदेशाचे तापमान .१५ ते .०६ डिग्री सेल्सियने (एकूणात .२७ डिग्री) वाढल्यामुळे या नद्यांच्या वितळण्यात वाढ झाली आहे. सहाजिकच त्या आटत चालल्या आहेत. पर्यावरणतज्ज्ञांनी या गंभीर मुद्याकडे कोपेनहेगन परिषदेच्या निमित्ताने जमणार्या नेतेमंडळींचे लक्ष वेधले आहे. पर्यावरण बदलासंदर्भातील आंतरसरकारी समितीने हिमालयातील हिमनद्या २०३५ पर्यंत गायब होणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. या बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नेपाळ आणि भूतानमध्ये तर या हिमनद्यांचे रूपांतर मोठमोठ्या तलावांमध्ये झाले असून ते कधीही फुटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याखालील गावे जलमय होण्याची भीती आहे. नेपाळी गिर्यारोहक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता दावा स्टिव्हन शेर्पा सध्या वितळत जाणार्या हिमालयाबाबत जागृती करतो आहे. २००७ मध्ये एका मोहिमेत बेस कॅम्पवर असताना हा कॅम्पच कोसळला होता. त्यातून दावा वाचला. तेव्हापासून त्याने हिमालयाला वाचविण्यासाठी जागृती सुरू केली आहे.