पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.पहाटेच्या सुमारास ते करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात जाऊन अनेकदा परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच, गेल्याच आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी आमदार महेश लांडगे देखील तिथे उपस्थित होते. शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले होते.
रविवारी आमदार लांडगे यांच्या प्रकृतीमध्ये बदल वाटल्याने त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.