राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात १०८१ रुग्णांची नोंद झाली असून, मुंबईत ७३९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्यस्थितीतील ही रुग्णवाढ मोठी चार महिन्यानंतर सर्वात मोठी असल्याचे मानले जात आहे. तसेच, २४ फेब्रुवारीनंतरची महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्णसंख्या बुधवारी आढळली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात निर्बंध लागणार का, यावर चर्चा रंगल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यासह देशभरातील सर्व नियम शिथिल करण्यात आले. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावरही भर देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर सुद्धा कोरोनाने देशाच्या अनेक राज्यांमध्ये डोके वर काढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने सरकारनेही काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तर, गेल्या २४ तासात कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईत सध्या २९७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत करोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या १० लाख ६६ हजार ५४१ वर पोहोचली आहे. तर, १९५६६ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईत ४ फेब्रुवारी रोजी ८४६ करोना रुग्णांची नोंद झाली होती.