राज्यात कोरोना रुग्णांच्या घसरणीचा मंदावलेला वेग आणि 'डेल्टा प्लस' या नव्या कोरोना व्हेरिएंटचा वेगानं प्रसार होण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबद्दल चर्चाही झाली. हे निर्बंध काय असतील आणि केव्हापासून अंमलात येतील हे जरी अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालं नसलं, तरी लवकरच ते जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
तिसऱ्या लाटेबद्दल केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं बोलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप अधिक संसर्ग असणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यातही त्यांनी घाईघाईनं निर्बंध शिथिल करुन नका असं जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं. नव्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारनं अधिक निर्बंधांची तयारी सुरु केली आहे, असंही या सल्ल्याकडे पाहिलं जातं आहे.
बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी चिंतेची बाब आणि 'डेल्टा प्लस'चे रुग्ण
दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारनं राज्यभरात निर्बंध शिथिल करणं सुरु केलं. पाच विविध स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली आणि जिथं चिंताजनक रुग्णवाढ आहे ते जिल्हे वगळता अन्य सर्वत्र नेहमीच्या व्यवहारांसाठी मोकळीक दिली. पण त्यानंतरही रुग्णवाढ मर्यादेत राहिली होती.
पण निर्बंध हटवल्यामुळे सर्वत्र गर्दी पाहायला मिळते आहे. विशेषत: बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी चिंतेची बाब बनली आहे. अनेक पर्यटन स्थळांवरही गर्दी पहायला मिळाली. गेला आठवडाभर राज्यातली रुग्णसंख्या कमी होतांना पाहायला मिळाली, पण ती बुधवारी पुन्हा दहा हजारांच्या पार गेली.
त्याशिवाय म्युटेशन होऊन देशातल्या अन्य भागांमध्ये आढळायला लागलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन 'डेल्टा प्लस' या नव्या रुपाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. तो आकड्यांमध्ये सध्या कमी वाटतो आहे, पण त्याच्या परिणामकारकतेविषयी अद्याप पूर्ण संशोधन झाले नाहीय. महाराष्ट्रात या विषाणूच्या रुपाचे 21 तर देशभरात 40 रुग्ण आहेत हा आतापर्यंतचा अधिकृत आकडा आहे.
त्याच्या पार्श्वभूमीवरच निर्बंध अधिक कठोर करण्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी चर्चा झाली. नाव न घेण्याच्य अटीवर एका वरिष्ठ मंत्र्यांनी निर्बंध कडक करण्याबद्दल चर्चा झाल्याचं 'बीबीसी मराठी'ला सांगितलं.
त्यामध्ये सर्वप्रथम दुकानांच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता आहे. या शिवाय अन्य काही निर्बंध असतील, पण ते मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री जाहीर करतील असं सांगण्यात आलं. आम्ही आरोग्यमंत्र्यांची याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही.
घाईघाईनं निर्बंध शिथिल करु नका : मुख्यमंत्री
नुकचेत शिथिल केलेले निर्बंध पुन्हा कठोर करण्याची शक्यता असतांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक संसर्गाचं प्रमाण असणाऱ्या जिल्ह्यांना घाईघाईनं निर्बंध शिथिल करु नका असं सांगितलं आहे.
"दुसऱ्या लाटेचं शेपूट अद्याप बाकी आहे. आपण त्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरीही स्थानिक प्रशासनानं प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कोणताही धोका न पत्करता निर्बंधांबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. स्तरांचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील, तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळेच न ओसरलेल्या दुसऱ्या लाटेबद्दल आणि शिथिल निर्बंधांबद्दल राज्य सरकार अद्यापही साशंक आहे, हे स्पष्ट होतं आहे.
त्याचबरोबर 'डेल्टा प्लस' या विषाणूचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचं केंद्र सरकारनं राज्याला इशारा देऊन सांगितल्यानं दिलेली शिथिलता पुन्हा काही प्रमाणात मागे घेण्याचं सरकारचं मत बनल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नवे नियम कधी जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
पण दुसरीकडे, असा निर्णय घेतांना व्यापारी वर्गाचं मतही विचारात घ्यावं लागणार आहे. दुसऱ्या लॉकडाऊनलाही त्यांच्या विरोध होता. आता पुन्हा व्यवसाय हळूहळू सुरु होतांना जर निर्बंध परत आले तर अधिक विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सरकार यातून मार्ग कसा काढतं हेही पहायला लागेल. राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण पुन्हा सुरु झालं आहे आणि महाराष्ट्र रोज विक्रमी लसीकरण करतो आहे ही जमेची बाजू आहे. पण तशा स्थितीतही सरकार पुन्हा निर्बंध आणणार का हा प्रश्न आहे.