Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना दिवाळीः मास्क लावला की कोरोनापासून 100 टक्के संरक्षण होतं का?

कोरोना दिवाळीः मास्क लावला की कोरोनापासून 100 टक्के संरक्षण होतं का?
, गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (15:14 IST)
"आता परिस्थिती आटोक्यात आली आहे असे वाटत असले तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे 15 दिवस आपली कसोटी असणार आहे." दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
दिवाळीसाठी सर्वत्र मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग सात-आठ महिने घरी बसलेले लोकं आता खेरीदीसाठी बाहेर पडत आहेत.
 
गर्दीत फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नाही. पण तोंडावर मास्क लावल्याने आम्ही सुरक्षित आहोत अशी भावना लोकांमध्ये आहे. पण मास्क लावल्याने खरंच कोरोनापासून 100 टक्के संरक्षण मिळतं का?
 
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, "आपण बोलताना किंवा खोकताना ड्रॉपलेट्स बाहेर पडतात आणि हवेत पसरतात. मास्क घातल्याने तयार होणारे ड्रोपलेट्स मास्कमध्येच अडकतात किंवा मास्कमध्येच थांबवले जातात. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल, तर हे ड्रोपलेट्स मास्कमध्येच अडकल्याने दुसऱ्यांना आजारी व्यक्तीपासून संसर्ग होत नाही."
 
"मास्क योग्य पद्धतीने घातला नाही किंवा काही कारणांमुळे लिक झाला तर, ड्रॉपलेट्स हवेमध्ये पसरण्याची शक्यता असते. यामुळे इतरांनाही धोका असतो,"
 
पण खरंच मास्क लावल्याने तुम्ही कोरोनापासून 100 टक्के सुरक्षित होता का? मास्क किती सुरक्षित आहेत? मास्क वापरत असताना कोणती काळजी घ्यावी? कोणत्या प्रकारचे मास्क वापरावेत? दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार का? अशा अनेक प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.
 
गर्दीत मास्क किती सुरक्षित?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात दररोज साधारण 3-4 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळतात. राज्यातील सरासरी मृत्यूदर 2.63 टक्के इतका आहे.
 
मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्य सरकारने बाजारपेठा, दुकानं, मॉल्स, जिम, सार्वजनिक वाहतूक, सिनेमागृह अशा अनेक गोष्टी काही नियमांतर्गत सुरू केल्या आहेत. यामध्ये मास्क वापरणे, स्वच्छता राखणे आणि एकमेकांपासून अंतर ठेवणे या बाबी बंधनकारक आहेत.
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे. ग्राहक मास्क तर वापरत आहेत पण पुरेसे अंतर राखले जात नाही असे दिसून येते. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे. शिवाय, मास्क कोरोनापासून किती सुरक्षा देतात? असाही प्रश्न उपस्थित होतो.
 
मास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येते. मास्क वापरल्याने शिंकताना किंवा खोकताना नाकातून किंवा तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्याद्वारे विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी करतात.
 
महाराष्ट्र वैद्यकीय संघटनेचे प्रमुख डॉ.अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "मास्क 50 टक्के सुरक्षा देऊ शकतात. मास्क वापरून 50 टक्के धोका कायम राहतो. पण गर्दीच्या ठिकाणी ही शक्यताही कमी आहे. एकदा मास्क घातल्यावर तुम्ही त्याला सारखा हात लावायचा नसतो. थेट घरी आल्यावर तो मास्क काढायचा असतो. पण या नियमाचे पालन होत नाही." अशा निष्काळजीपणामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढतो असं मत डॉ.भोंडवे यांनी व्यक्त केले.
 
नाशिकमधील मुख्य बाजारपेठेतील दहीपुला कडे जाणारा रस्ता. गर्दीमुळे चार चाकी वाहनांना बंदी करावी लागली.
 
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात 80 टक्के रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोनाची लागण तर झाली आहे पण लक्षणं नाहीत. त्यामुळे गर्दीत असे असंख्य लोक असण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीजवळ तुम्ही 10 मिनिटं जरी थांबलात तरी तुम्हाला संसर्ग होऊ शकतो,"
 
काय काळजी घ्याल?
मास्क तोंडावर न लावता केवळ सोबत ठेऊन त्याचा उपयोग नाही. काही लोक मास्क गळ्यात अडकवताना दिसतात. काहीजण नाकावर न लावता केवळ ओठ झाकतात. काहीजण मास्क वापरत नाहीत. या कारणांमुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
 
व्हायरॉलॉजिस्ट डॉ.अभय चौधरी सांगतात, "मास्क वापरण्याची एक योग्य पद्धत आहे. मास्कने नाक आणि तोंड झाकले गेले पाहिजे. कारण कोरोनाचा संसर्ग नाक आणि तोंडावाटे अधिक वेगाने होऊ शकतो."
 
ते पुढे सांगतात, "केवळ मास्क वापरून चालणार नाही तर हात स्वच्छ हवेत. त्यासाठी वारंवार सॅनिटाईज करत रहाणं गरजेचे आहे. कारण संसर्गजन्य हात तुम्ही मास्कला लावले तर पुन्हा धोका वाढतो."
 
डोळ्यावाटेही कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. डॉ.चौधरी सांगतात, "बाहेर पडल्यावर विशेषत: गर्दीत असताना सारखा डोळ्याला हात लावू नये. चष्मा वापरत असाल तर डोळे अधिक सुरक्षित राहतील."
 
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी आता टेस्ट कमी झाल्या आहेत हा मुद्दाही सर्वांनी लक्षात घ्यायला हवा असं डॉ.अविनाश भोंडवे सांगतात.
 
कोरोनाच्या टेस्ट कमी झाल्या असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा दावाही डॉ.भोंडवे यांनी केला.
 
आता मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडत आहेत. पण तरीही कोरोना काळ संपलेला नाही हे लोकांनी विसरू नये अशी ताकीद राज्य सरकारनेही दिली आहे.
 
कुणालाही काही त्रास होत असल्यास त्यांनी दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तसेच बरं वाटत नसल्याच आपली नैतिक जबाबदारी समजून बाहेर जाऊ नका. असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
 
कोणता मास्क वापरणे अधिक सुरक्षित?
मास्कचे प्रकार-
 
1. सर्जिकल मास्क
 
2. कॉटन मास्क
 
3. N-95 मास्क
 
4. व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क (मास्कच्या बाजूला हवा जाण्यासाठी असलेलं छिद्र)
 
डॉ. अभय चौधरी सांगतात, "कॉटनच्या मास्कपेक्षा सर्जिकल मास्क केव्हाही अधिक सुरक्षित. कॉटन हे कापड असल्याने त्यात फिल्टरेशनची प्रक्रिया होत नाही. सूत असल्याने संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते."
 
"कॉटन मास्कच्या तुलनेत सर्जिकल मास्क प्रभावी ठरतो. सर्जिकल मास्कमध्ये आतून-बाहेरून दोन्ही मार्गाने संसर्ग होत नाही,"
 
यापैकी व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कचा वापर हानिकारक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
 
व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कच्या वापराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्यसेवा संचालक डॉ. राजीव गर्ग यांनी या पत्रात व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कमुळे कोव्हिड-19 व्हायरसला बाहेर जाण्यापासून थांबवता येत नाही. त्यामुळे या मास्कचा वापर कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत हानिकारक असल्याचं नमूद केलंय.
 
रेस्पिरेटर असलेला मास्क कोणी वापरावा?
पुण्याच्या पल्मोकेअर रिसर्च आणि एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांच्या माहितीनुसार, N-95 मास्क हा प्रदूषित ठिकाणी काम करण्यासाठी बनवण्यात आला आहे. जेणेकरून श्वास घेताना प्रदूषणाचे कण शरीरात जाणार नाहीत.
 
हा मास्क कोव्हिड-19 आयसीयूमध्ये काम करणाऱ्यांनी वापरावा. ज्याठिकाणी 4-5 तास पीपीई किट घालून काम करावं लागतं.
 
व्हॉल्व्ह असलेल्या मास्कने काय होतं?
मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट इंटेसिव्हिस्ट आणि छातीरोगतज्ज्ञ डॉ. हरीष चाफळे म्हणतात, "रुमालाने किंवा अन्य मास्कने चेहरा झाकल्याने काही वेळ गुदमरल्यासारखं वाटल्याने लोक हा मास्क वापरतात. या मास्कमध्ये जास्त उष्णता जाणवत नाही. याशिवाय या मास्कचा फारसा उपयोग नाही.
 
सर्दी, खोकला अशी लक्षणं असल्यास त्या व्यक्तीने हा मास्क वापरणं टाळावं. जेणेकरून इतर कोणत्याही निरोगी व्यक्तीला संसर्गाची लागण होणार नाही."
 
"बाजारात किंवा कामाला जाताना हे मास्क लोक वापरू शकतात. या मास्कमध्ये कार्बनडायऑक्साईड मास्कच्या आत राहात नाही. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत नाही." असं डॉ. सतीश यांचं मत आहे.
 
दंडात्मक कारवाई
घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे.
 
मुंबईत मास्क न वापरल्यास महानगरपालिकेकडून 200 रुपये दंड वसूल करण्यात येतो. 7 नोव्हेंबरपर्यंत 4 कोटी 79 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुण्यातही सप्टेंबरपर्यंत 5 कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
 
राज्यातील नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण या नियमांची अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी होताना दिसत नाही. परिणामी आगामी काळात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लस आल्यावर प्रथम कोणाला लस दिली पाहिजे, ब्रिटनचे मत काय आहे ते जाणून घ्या