शहरात होत असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्य प्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत असुन साहित्य संमेलनासाठी येणार्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. लस घेतलेल्या व्यक्तींनाच आत प्रवेश दिला जात आहे.
ओमिक्रॉन विषाणुच्या पार्श्वभुमीवर साहित्य संमेलन नगरीत चोख खबरदारी घेतली जात आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा एक किंवा दोन डोस घेतले आहे अशा व्यक्तींनाच संमेलनस्थळी प्रवेश दिला जात आहे.
ज्या व्यक्तींनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही अशा व्यक्तींना प्रवेश देण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळच लस देण्याची सोय नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आली आहे. संमेलन स्थळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजकांचे वैद्यकीय पथक येणार्या सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंग आणि त्यांनी घेतलेल्या लसीकरणाचे पुरावे तपासत आहे.
या ठिकाणी येणार्या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट आणि रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणी महापालिका वैद्यकीय पथकांमार्फत केली जात आहे. संमेलनात येणार्या लहान मुलांना लसीची अट लागू नाही. सर्व नागरिकांना मास्क व सामाजिक अंतर पाळणे अनिवार्य आहे.
नक्की वाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन; छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचवणारा शाहीर काळाच्या पडद्याआड
शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत 26 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले असुन 17 जणांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे आणि 7 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.