होम टेस्टिंग किटचा वापर करून घरीच कोरोना चाचणी करणाऱ्यांचा शोध महाराष्ट्र सरकारने सुरू केलाय.
ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेत अनेकांनी लक्षणं दिसू लागल्यानंतर घरच्या-घरीच कोव्हिड टेस्ट केली. मात्र, रिपोर्टची माहिती सरकारला दिली नाही. ज्यामुळे, कोरोनाची लागण झालेल्या हजारो रुग्णांना ट्रॅक करणं शक्य होत नाहीये.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बीबीसीशी बोलताना सांगतात, "मुंबईत 96,000 लोकांनी होम टेस्ट किट वापरल्याची पालिकेला माहिती मिळालीये. यातील 3 हजारपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह आहेत."
सरकारला भीती आहे की, कोरोना चाचणीची माहिती न दिल्यामुळे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या माध्यमातून संसर्ग इतरांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे सरकारने होम टेस्ट किट वापरणाऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलंय.
होम टेस्ट किट वापरणाऱ्यांच्या संख्या वाढलीये का?
ओमिक्रॉन महाराष्ट्रात झपाट्याने पसरला. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या महानगरांमध्ये काही दिवसातच रुग्णसंख्या 100 पटींनी वाढली. यामुळे टेस्टिंग लॅबवरचा ताण प्रचंड वाढला. परिणामी रिपोर्ट येण्यासाठी दोन-तीन दिवस लागत होते.
होम टेस्ट किट वापरून रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट रिपोर्ट फक्त 15 ते 20 मिनिटांत येतो. त्यामुळे, अनेकांनी कोरोना चाचणीसाठी होम किट्सचा वापर केला.
मुंबई महापालिकेच्या अंदाजानुसार, शहरात जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसांत 3 लाखांपेक्षा जास्त कोरोना होम टेस्ट किट्स विकले गेले आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, "होम टेस्ट किटचे काही आकडे मिळाले आहेत. आम्ही यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय."
होम टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असाल तर पालिकेला याची माहिती द्या, जेणेकरून वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकेल, असं ते पुढे म्हणाले.
ओमिक्रॉन हा नाक आणि घशापर्यंत मर्यादीत रहातोय. फुफ्फुसांपर्यंत संसर्ग फार कमी दिसत असल्याने रग्णांना सर्दी, खोकला आणि ताप अशी सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे लोक घरीच कोरोना चाचणीसाठी उपलब्ध किट्सचा वापर करून टेस्ट करत आहेत.
महाराष्ट्र फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश तांदळे सांगतात, "ओमिक्रॉनची लाट सुरू झाल्यापासून होम टेस्ट किट्सची मागणी प्रचंड वाढलीये. मुंबईत दिवसाला काही हजार टेस्ट किट्सची विक्री होतेय."
तर, राज्यातही मोठ्या संख्येने लोक टेस्ट किट्स विकत घेत आहेत.
कोव्हिड टेस्ट किट कंपनी मायलॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक हंसमुख रावल बीबीसीशी बोलताना सांगतात, "डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना चाचणीसाठी होम टेस्ट किटची विक्री तब्बल 400 ते 500 पटींनी वाढलीये."
फार्मासिस्ट पुढे माहिती देतात, अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही ग्राहकांची माहिती ठेवणं सुरू केलंय. ही माहिती FDA सोबत शेअर केली जाते.
होम टेस्ट किट वापरणाऱ्यांच्या शोध का घेतला जातोय?
राज्यात गेल्याकाही दिवसात हजारो नागरिकांनी होम टेस्ट किट्स विकत घेतलेत. यातील काही कोरोना पॉझिटिव्ह आले असतील.
होम किट्स वापरणाऱ्यांच्या शोध मोहिमेची प्रमुख कारणं,
होम किट्स वापरून लोक कोरोनाची चाचणी करतायत. मात्र पॉझिटिव्ह आल्यास रिपोर्टबाबत माहिती देत नाहीत.
रग्णांचं ट्रॅकिंग होत नसल्यामुळे कोरोनासंसर्गात वाढ.
अशा रुग्णांना शोधून संसर्गावर आळा घालण्याची गरज.
संसर्गाची खरी आकडेवारी समोर येत नाही.
होम किट्सच्या भरमसाठ वापराचा मुद्दा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत उपस्थित केला होता.
बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "होम किट्स आणि रॅपिड अॅन्टीजिन टेस्टममध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांची माहिती मिळत नाही. ही गोष्ट केंद्राच्या लक्षात आणून दिली आहे."
ते पुढे म्हणाले, "हे किट घेणाऱ्यांची नोंद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अशा रुग्णांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी करता येईल."
होम टेस्ट किट्सची वाढती मागणी लक्षात घेता, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलं होतं. ते लिहीतात, "अनेक लोक होम टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आले असतील. होम आयसोलेशनमध्ये असल्याने त्यांनी माहिती दिली नसेल."
घरच्या घरी केलेल्या रॅपिड अॅन्टीजिन टेस्टमध्ये डेल्टचा संसर्ग झालाय की ओमिक्रॉनचा याची माहिती मिळत नाही. गंभीर आजारास कारणीभूत डेल्टा व्हेरियंट अजूनही समाजात पसरतोय. त्यामुळे "यापैकी काही रुग्णांना रुग्णालयात उपचारांची गरज भासू शकते. सहव्याधी असतील तर आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू शकतो," आरोग्य सचिव पुढे लिहीतात.
जिल्हा आणि पालिका प्रशासनाने अन्न व औषध विभागासोबत काम करावं अशी सूचना राज्य सरकारने केलीये.
होम टेस्ट किट्सबाबत मुंबई महापालिकेची नियमावली?
होम टेस्ट किट्सची वाढती मागणी आणि रिपोर्टबाबत माहिती देणाऱ्यांची संख्या यात खूप तफावत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने कोरोना किट्सची निर्मिती करणारे, व्यापारी आणि केमिस्ट दुकानदारांना या किट्सबाबत माहितीसाठी नियमावली जारी केलीये.
रॅपिड अॅन्टीजिन टेस्ट किट्सची निर्मिती करणाऱ्यांनी केमिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल स्टोअर यांना किती किट्स विकली याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त आणि अन्न व औषध विभागाला द्यावी.
केमिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल स्टोअर मालकांनी किती ग्राहकांनी ही किट्स खरेदी केली याची माहिती अन्न व औषध विभाग आणि पालिकेला देणं बंधनकारक.
होम टेस्ट किट विकल्याचं बिल ग्राहकांना देऊन त्यांचा रेकॉर्ड ठेवावा.
अन्न व औषध विभाग होम टेस्ट किटची विक्रीवर लक्ष ठेवणार.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, "होम टेस्ट किट्सचा डाटा सर्व वॉररूमला देण्यात येईल. या टीम्स होम किट्स वापरणाऱ्यांना फोन करतील. रुग्ण टेस्ट रिपोर्ट ICMR च्या वेबसाइटवर अपलोड करतील हे पाहिलं केलं जाईल."
अन्न व औषध प्रशासनानेही राज्यातील सर्व केमिस्टस, फार्मासिस्ट आणि मेडिकल दुकानांना होम टेस्ट किंवा रॅपिड अॅन्टीजिन टेस्ट किट घेणाऱ्यांची माहिती ठेवण्याचं फर्मान जारी केलं होतं.
होम टेस्ट कधी करावी?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, होम टेस्ट किटला खूप जास्त मागणी आहे. हजारो लोक या किट्सचा वापर करून कोरोना चाचणी करत आहेत. होम टेस्टची किंमत 250 ते 300 रूपये आहे. तर, रॅपिड अॅन्टीजिन टेस्ट किटची किंमत 50 ते 100 रूपये आहे.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव रॅपिड अॅन्टीजिन आणि होम टेस्ट कधी करावी याची माहिती देतात.
ते म्हणाले, "रॅपिड अॅन्टीजिन आणि होम टेस्ट कोरोनासंसर्ग झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून आठ दिवसापर्यंत व्हायरस डिटेक्ट करू शकतात."
व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर पहिल्या दिवशी टेस्ट केली तर निगेटिव्ह येऊ शकते. याचं कारण, विषाणू आपल्या शरीरात पसरत असतो.
डॉ. भार्गव म्हणतात, "त्यामुळे केंद्र सरकारने होम आयसोलेशनमध्ये डिस्चार्ज पॉलिसी सात दिवसांची केली आहे."
काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये केंद्र सरकारने होम क्वॉरेंन्टाईनमध्ये असलेले रुग्ण सात दिवसांनंतर डिस्चार्ज मानले जातील, अशी माहिती दिली होती.