Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना लक्षण: लाँग कोव्हिड म्हणजे काय?

कोरोना लक्षण: लाँग कोव्हिड म्हणजे काय?
, शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (16:16 IST)
जेम्स गॅलाघर
बहुतांश लोकांमध्ये कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं आढळतात. काहींना मात्र दम लागणं, अंगदुखी, थकवा, अशा समस्या अनेक महिने जाणवतायत.
 
वैद्यकीय भाषेत याला 'लाँग कोव्हिड' म्हणतात. लाँग कोव्हिडचा लोकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसतंय. अगदी थोडंसं चालल्यावरही दमायला होतं, असं सांगणाऱ्यांची संख्या वाढतेय.
 
कोरोना विषाणूच्या जागतिक आरोग्य संकटात आतापर्यंत लोकांचे प्राण वाचवण्यावरच प्रामुख्याने भर होता. पण कोव्हिड-19 संसर्गाच्या शरीरावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांविषयीची चिंता आता वाढू लागली आहे.
 
कोव्हिड-19 आजार झाल्यानंतर काही जणांमध्ये त्याची लक्षणं दीर्घकाळ का टिकून राहतात किंवा या आजारातून बचावलेला प्रत्येक जण पूर्णपणे बरा होतो का, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
 
लाँग कोव्हिड म्हणजे काय?
याची वैद्यकीय व्याख्या नाही किंवा सर्व रुग्णांमध्ये समान लक्षणं आढळतातच, असंही नाही. लाँग कोव्हिडचा सामना करणाऱ्या दोन रुग्णांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात.
 
पण शरीरातली सगळी शक्ती ओढून घेणारा थकवा येणं हे अनेकांमध्ये आढळणारं लक्षण आहे.
 
धाप लागणं, सतत खोकला येणे, सांधेदुखी, स्नायूदुखी, नीट ऐकू न येणं किंवा नीट न दिसणं, डोकेदुखी, गंध आणि चव न कळणं अशा इतर काही समस्या दीर्घकाळ जाणवतात. तर काही जणांमध्ये या आजाराचा हृदय, फुफ्फुसं, किडनी आणि आतड्यांवरही परिणाम होतो.
 
याशिवाय, नैराश्य, ताण आणि स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता बाधित होणे, अशा मानसिक समस्यांही काही जणांमध्ये दिसून आल्या आहेत.
 
या सगळ्याचा परिणाम रोजच्या आयुष्यावर होत असल्याचं जेड ग्रे-क्रिस्टी म्हणतात. जेड यांनीदेखील लाँग कोव्हिडचा सामना केला आहे. त्या म्हणतात, "असा थकवा मी यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता."
 
लाँग कोव्हिड म्हणजे केवळ अतिदक्षता विभागातून बाहेर यायला वेळ लागणं नव्हे. तर बरेचदा सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोनाग्रस्तांमध्ये काही लक्षणं दीर्घकाळ कायम राहतात आणि कधीकधी परिस्थिती गंभीरही होऊ शकते.
 
युनिव्हर्सिटी ऑफ एक्झेटरमध्ये प्राध्यापक असलेले डेव्हिड स्ट्रेन म्हणतात, "लाँग कोव्हिड होतो, यात आता कुठलीच शंका नाही." प्रा. स्ट्रेन हे 'क्रोनिक फटिग सिन्ड्रोम क्लिनिक' चालवतात. या क्लिनिकमध्ये त्यांनी अनेक असे रुग्ण बघितले ज्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. ते त्यातून बचावलेदेखील. पण या आजाराची लक्षणं त्यांच्यात दीर्घकाळ होती.
 
किती लोकांना याचा त्रास होतो?
रोममधल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये 143 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये याविषयीची पाहणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या रुग्णांवर या संशोधनासाठी लक्ष ठेवण्यात आलं.
 
यापैकी 87% रुग्णांना दोन महिन्यांपर्यंत किमान एक लक्षण जाणवत राहिल्याचं यात आढळलं. तर जवळपास निम्म्या लोकांना दीर्घकाळ थकवा जाणवला.
 
मात्र, हा अभ्यास ज्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते त्यांच्यावरच करण्यात आला आणि अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.
 
यूकेमध्ये जवळपास 40 लाख लोक कोव्हिड-19 सिम्पटम्स ट्रॅकर अॅप वापरतात. यापैकी 12% लोकांना लागण होऊन गेल्याच्या 30 दिवसांनंतरही लक्षणं जाणवतात. तर लागण झालेल्यांपैकी 2% लोकांना 90 दिवसांनंतरही लक्षणं जाणवत असल्याचा अंदाज आहे.
 
गंभीर रुग्णांनाच लाँग कोव्हिडचा त्रास जाणवतो का?
नाही.
 
डब्लिनमध्ये संशोधन करण्यात आलेल्या लोकांपैकी निम्म्या लोकांना 10 आठवड्यांनंतरही थकवा जाणवत होता. तर एक तृतियांश जण 10 आठवड्यांनंतरही कामावर परतू शकले नाहीत.
 
संसर्गाची तीव्रता आणि थकवा यात डॉक्टर्सना थेट संबंध अजून आढळलेला नाही. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अतिथकवा हे लाँग कोव्हिडच्या अनेक लक्षणांपैकी एक आहे.
 
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या फुफ्फुसांमधला न्यूमोनिया
 
युनिव्हर्सिटी ऑफ लिस्टरमधले प्राध्यापक आणि कोव्हिड-19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांचा अभ्यास करण्यासाठीच्या PHOSP कोव्हिड प्रोजेक्टमध्ये चीफ इन्व्हेस्टिगेटर असणारे प्रा. क्रिस ब्राईटलिंग यांच्या मते ज्यांना न्यूमोनिया होतो त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्याने त्यांना जास्त त्रास होतो.
 
कोरोना व्हायरसमुळे लाँग कोव्हिड कसा होतो?
याची अनेक कारणं असू शकतात. मात्र, कुठलंही एक निश्चित उत्तर अजून मिळालेलं नाही.
 
कदाचित शरीरातल्या बऱ्याचशा भागातून विषाणू बाहेर पडतो. पण काही छोट्या पोकळ्यांमध्ये तो बराच काळ घर करून राहतो.
 
लंडनमधल्या किंग्ज कॉलेजमधे प्राध्यापक टिम स्पेक्टर म्हणतात, "अनेक दिवस अतिसाराचा त्रास जाणवत असेल तर आतड्यांमध्ये हा विषाणू असू शकतो. गंध येत नसेल तर विषाणू मज्जातंतूंमध्ये असू शकतो."
 
कोरोना व्हायरस शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींवर थेट परिणाम करू शकतो. यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक सक्रीय झाली तर त्याचेही शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
 
कोव्हिड-19 नंतर रोगप्रतिकारक यंत्रणा पुन्हा पूर्वीसारखी होत नाही आणि यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, असाही एक मतप्रवाह आहे.
 
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अवयवांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः फुफ्फुसांच्या बाबतीत. सार्स आणि मर्स या कोरोना कुटुंबातल्या विषाणूंच्या साथीच्यावेळीसुद्धा असाच प्रकार आढळला होता.
 
मात्र, कोव्हिड-19 चा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही तर चयापचय शक्तीवरही (Metabolism) होऊ शकतो. अशा अनेक केसेस आढळल्या आहेत ज्यात कोव्हिडमुळे मधुमेहाचा त्रास सुरू झाला आणि आजारातून उठल्यानंतरही अनेकांना रक्तातल्या शर्करेची पातळी सामान्य ठेवण्यात अडचणी येत आहेत.
 
सार्सच्या साथीवेळी अनेकांमध्ये तब्बल 12 वर्ष शरीरातील चरबीवर (Fats) प्रक्रिया करण्याच्या क्षमतेत बदल झाल्याचं आढळून आलं होतं.
 
मेंदूच्या संरचनेतही कोव्हिडमुळे काही बदल झाल्याचं काही प्राथमिक अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे. पण यावर अजून संशोधन सुरू आहे.
 
इतकंच नाही तर कोव्हिड-19 चा रक्तावरही परिणाम होत असल्याचं आढळलं आहे. यात रक्त गोठणे, शरीरातील रक्तवाहिन्यांच्या जाळ्यात अडचणी निर्माण होणे, असे प्रकार आढळून आले आहेत.
 
बीबीसीशी बोलताना प्रा. स्ट्रेन म्हणाले, "शरीरातील टिश्यूना ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये पुरवणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांना येणारं अकाली वृद्धत्व, यावर मी काम करतोय."
 
पण, 'लाँग कोव्हिड कशामुळे होतो, याचं उत्तर मिळत नाही तोवर त्यावर उपचार शोधणं कठीण' असल्याचंही ते म्हणतात.
 
असं होणं नेहमीपेक्षा वेगळं आहे का?
संसर्गजन्य आजारानंतर येणारा थकवा किंवा खोकला नवीन नाही. संसर्गजन्य असणाऱ्या अनेक आजारांमध्ये आजार होऊ गेल्यानंतरही बऱ्याच जणांना थकवा किंवा खोकल्याचा त्रास जाणवतो.
 
ग्लँड्युलर फिव्हर (Glandular Fever) म्हणजेच ग्रंथींच्या तापातून बरं झालेल्या दहापैकी एका व्यक्तीला अनेक महिने थकवा जाणवतो. इतकंच नाही फ्लूनंतर पार्किन्सन्स आजारातली काही लक्षणं विकसित होत असल्याचंही काही संशोधनांमध्ये आढळलं आहे.
 
प्रा ब्राईटलिंग म्हणतात, "कोव्हिडमध्ये अधिक दीर्घकाळ टिकणारी लक्षणं दिसत आहेत आणि दीर्घकाळ लक्षणं असणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे."
 
मात्र, इथेही एक लक्षात घेतलं पाहिजे की हा केवळ अंदाज आहे. किती जणांना कोव्हिडची लागण झाली, याची निश्चित आकडेवारी मिळत नाही तोवर त्यातल्या किती लोकांना लाँग कोव्हिडचा त्रास झाला, हे सांगता येणार नाही.
 
प्रा ब्राईटलिंग म्हणतात, "प्रत्येक व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची पद्धत वेगळी आहे आणि पेशींच्या कार्यावरही त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होतो. या दोन्हीमुळे इतर संसर्गजन्य विषाणूंपेक्षा या विषाणू अधिक गंभीर संसर्ग होतो आणि लक्षणंही दीर्घकाळ टिकून राहतात."
 
लाँग कोव्हिड पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
काळानुसार लाँग कोव्हिड रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय.
 
कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरायला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली. त्यामुळे या नवीन आजाराविषयीचा फारसा डेटा उपलब्ध नाही.
 
प्रा. ब्राईटलिंग म्हणतात, "रुग्णांवर किमान 25 महिने लक्ष ठेवावं, असा माझा सल्ला आहे. मला आशा आहे की वर्षभरापेक्षा जास्त काळ लक्षणं टिकणार नाहीत. मात्र, मी चूकही ठरू शकतो."
 
रुग्ण आजारातून बरे होत असल्याचं दिसत असलं तरी त्यांना आयुष्यभर धोक्याचा सामना करावा लागू शकतो.
 
ज्यांना 'क्रोनिक फटिग सिंड्रोम'चा त्रास आहे त्यांना पुन्हा हा आजार होण्याची शक्यता आहे आणि भविष्यात होणारा संसर्ग अधिक गंभीर असण्याचीही शक्यता आहे.
 
प्रा. स्ट्रेन म्हणतात, "लाँग कोव्हिडचा पॅटर्न कोरोनाच्या इतर विषाणूंप्रमाणेच असेल तर तब्येतीत सुधारणा होण्याची काही शक्यता आहे. पण तर कोरोनाच्या इतर विषाणूंच्या संसर्गालाही हा संसर्ग प्रतिसाद देत राहिला तर मग दर हिवाळ्यात ही लक्षणं डोकं वर काढत राहतील."
 
भविष्यात गुंतागुंत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या दाहामुळे कमी वयातच हृदयासंबंधीचे आजार जडण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
 
लाँग कोव्हिड असल्यास काय कराल?
युकेतल्या NHS (नॅशनल हेल्थ सर्विस) ने लाँग कोव्हिड असणाऱ्यांना तीन सल्ले दिले आहेत.
 
भरपूर आराम करा, धावपळ करू नका
आठवड्याचं नियोजन करा. असं केल्याने ज्या कामांमध्ये जास्त शक्ती खर्च होते, ती कामं विभागता येतील.
कामाचे प्राधान्यक्रम ठरवा.
कोरोना विषाणूची लागण होऊन बरेच दिवस झाल्यानंतरही तुम्हाला कुठलाही त्रास जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रविवारी पीएम मोदी ही विशेष योजना सुरू करणार, गावातील लोकांना पैशाची कमतरता भासणार नाही!