कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्यातील आरोग्यव्यवस्था अपुरी पडत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकताच राज्य सरकारने लशींची कमतरता असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता पुण्यात व्हेंटिलेटर बेडच उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. केवळ पुणेच नाही, तर नागपूरमध्येही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीये. नागपूरमधील रुग्णांना उपचारासाठी अमरावतीला जावं लागत आहे.
पुण्याचा विचार केल्यास सद्यस्थितीत पुणे महानगरपालिका क्षेत्रात व्हेंटिलेटरची सुविधा असलेला एकही बेड उपलब्ध नाही. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोरोनाविषयक आकडेवारी दर्शवणाऱ्या पोर्टलवर ही माहिती दिसत आहे.
पुण्यात कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी सरकारी तसंच खासगी रुग्णालये मिळून एकूण 543 व्हेंटिलेटरनी सुसज्ज बेडची व्यवस्था करण्यात आली होती. पण शनिवारी (10 एप्रिल) पहाटेपर्यंत हे सर्व व्हेंटिलेटर वापरण्यात येत होते.
शेजारील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील परिस्थितीही वेगळी नाही. याठिकाणी कोव्हिड रुग्णांच्या सेवेसाठी 249 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली होती. पण त्यापैकी शनिवार (10 एप्रिल) दुपारी साडेतीन वाजता पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त 6 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते.
त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण क्षेत्रात सध्या केवळ 43 व्हेंटिलेटर उरले असल्याचं आकडेवारीवरून समजतं.
याचाच अर्थ पुण्यात रुग्णांच्या तुलनेत व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत असून यावर प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.
पुण्यात वाढती रुग्णसंख्या
शुक्रवारी (9 एप्रिल) महाराष्ट्रात 58 हजार 993 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 5714 नव्या कोव्हिड रुग्णांची नोंद झाली. तर पिंपरी चिंचवडमध्ये 2026 आणि पुणे ग्रामीण परिसरात 2343 नवे कोरोनाबाधित आढळले. पुण्याय गेल्या काही दिवसांपासून रोज पाच ते सहा हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत.
सध्या पुण्यात 100051 (एक लाख एकावन्न) सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पुण्यात गेल्या वर्षभरात सर्व मिळून एकूण 6 लाख 29 हजार 174 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत आतापर्यंत 5 लाख 1 हजार 182 रुग्णांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोव्हिडग्रस्तांसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील सर्व मिळून एकूण 8598 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यापैकी 1017 सध्या रिक्त आहेत. त्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था नसलेले 669 बेड, ऑक्सिजनची व्यवस्था असलेले 338 बेड, व्हेंटिलेटरची व्यवस्था नसलेले 10 ICU बेड शिल्लक आहेत. तर व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असलेला एकही बेड सध्या शिल्लक नाही.
ही परिस्थिती कशामुळे?
"कोरोनाची लागण झाल्यानंतर लक्षणं जाणवून सुद्धा रुग्ण ते लपवून ठेवतात. त्रास होत असूनही रुग्णालयात जाणं टाळलं जातं. पण त्रास खूप वाढल्यानंतर शेवटच्या टप्प्प्यात उपचारासाठी रुग्णालयाची वाट धरली जाते. यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम बहुतांश व्हेंटिलेटर बेड्स रुग्णांनी भरलेले आहेत," अशी माहिती डॉ. संग्राम कपाले यांनी दिली.
पिंपरी चिंचवडमधील अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरातील जम्बो कोव्हिड सेंटरची जबाबदारी डॉ. संग्राम कपाले यांच्या मेडब्रोज हेल्थकेअर कंपनीकडे आहे.
डॉ. कपाले यांच्या मते, गेल्या काही दिवसांत रुग्ण वेगाने वाढत आहेत. अशा स्थितीत रुग्णांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रशासनाला देण्यास टाळाटाळ करू नये.
डॉ. संग्राम कपाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीकडून चालवण्यात येत असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये दहा दिवसांत सुमारे 52 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. दाखल होणारे रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत रुग्णालयात येत होते. आल्यानंतर त्यांना थेट व्हेंटिलेटर बेडवर दाखल करावं लागेल, अशी त्यांची स्थिती होती. दोन ते तीन दिवसांच्या उपचारादरम्यानच या रुग्णांचा मृत्यू होत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी या परिस्थितीला सरकारलाही जबाबदार धरलं आहे.
डॉ. भोंडवे यांच्या मते, "गेल्या वर्षभरातील परिस्थितीतून प्रशासनाने कोणतीच शिकवण न घेतलेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
"राज्य आणि केंद्र सरकार या दोघांकडून पूर्वीपासूनच आरोग्य विषयक बाबींकडे दुर्लक्ष झालं आहे. आता अचानक कोरोना साथीचं संकट आल्यानंतर सरकार त्यावर तात्पुरते उपाय करण्याचा प्रयत्न करत आहे, अचानक खासगी रुग्णालयांच्या बेडवर ताबा घेतला जातो. पण असे निर्णय घाईगडबडीने करण्यापेक्षा अतिशय नियोजनपूर्वक ही परिस्थिती हाताळणं आवश्यक आहे, " असं मत डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केलं.
चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय गोकुळे यांच्या मते ही परिस्थिती निर्माण होण्यास प्रशासन आणि नागरिक दोघेही जबाबदार आहेत.
ते सांगतात, "ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आली. या काळात कोरोना संपल्याच्या अविर्भावात नागरिक दिसून आले. दुसरीकडे प्रशासनानेही त्यावेळी योग्य ती खबरदारी पाळणं आवश्यक होतं. पण दोन्ही बाजूंनी यामध्ये शिथिलता आली. याचाच परिणाम राज्यावर आज ही परिस्थिती ओढवली आहे. "
यंदाची कोरोना लाट गेल्या वर्षीपेक्षाही मोठी आहे. त्याच्यासमोर सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याचं सध्याचं चित्र आहे. गेल्या वर्षी कोरोना साथ घोषित झाल्यानंतर राज्याला केंद्राकडून व्हेंटिलेटर मिळाले होते. पण ते पुरेशा प्रमाणात देण्यात आले नाहीत. शिवाय निर्बंधांमुळे वैद्यकीय उपकरणं मिळण्यास विलंब होतो. व्हेंटिलेटर विकत घेण्याची ऑर्डर दिल्यानंतर दोन महिन्यांनी ते प्राप्त होतात. मागणी आणि पुरवठा यांमधील तफावतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं, असं डॉ. गोकुळे म्हणाले.
उपाय काय?
पिंपरी चिंचवड जम्बो कोव्हिड सेंटर येथील व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. त्यासंदर्भात आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत, अशी माहिती कोव्हिड सेंटर प्रमुख डॉ. संग्राम कपोले यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
टंचाईची ही परिस्थिती निर्माण न होण्यासाठी काय पर्याय आहेत, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, "सध्या गंभीर रुग्णांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे रुग्ण उशीराने रुग्णालयात दाखल होणं. कोव्हिडची लक्षणे पाहिल्यास पहिले पाच ते सात दिवस रुग्णांना काहीच त्रास जाणवत नाही. पण अचानक त्यांची तब्येत बिघडते, मग ते रुग्णालयात धावाधाव करतात."
या पहिल्या टप्प्यातच रुग्णांची काळजी योग्य प्रकारे घेतली तर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही. पण त्यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे, असं डॉ. कपाले यांना वाटतं.
ते सांगतात, कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांची देखभाल होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथं कर्मचारी उपलब्ध असतात. पण होम क्वारंटाईन रुग्णांच्या बाबतीत विशेष नियोजनाची सध्या गरज आहे.
त्यांच्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही यंत्रणा वेळोवेळी होम क्वारंटाईन रुग्णांचं फॉलोअप घेईल. त्यांच्या तब्येतीत कितपत सुधारणा होत आहे. त्यांची कोणती टेस्ट करावी लागेल, त्यांची ऑक्सिजन पातळी योग्य आहे किंवा नाही या गोष्टींची तपासणी करेल. कुटुंबीयांच्या हातून या गोष्टी शक्य होत नाहीत. शिवाय त्यांना धोकाही असतो, असं डॉ. कपाले म्हणाले.
डॉ. अविनाश भोंडवे यांनीही हाच मुद्दा मांडला. राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या फेसबुक लाईव्हमध्ये केलं होतं. याचा उल्लेख करताना डॉ. भोंडवे यांनी आणखी एक उपाय सुचवला.
ते सांगतात, "होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांवर नजर ठेवणं. त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं, यामध्ये प्रशासन कमी पडत असल्याचं दिसून येतं. यावर उपाय म्हणून इतर राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांचा उपयोग करून घेता येऊ शकेल. वैद्यकीय कर्मचारी केरळमधून मागवण्याचा प्रयोग आपण करून पाहिला होता. डॉक्टरांच्या बाबतीतही हाच प्रयोग करता येऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग नसलेल्या इतर राज्यातून काही काळापुरते डॉक्टर प्रशासनाने मागवून घ्यावे.
त्याचप्रमाणे, ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त नाही, त्या राज्यांमधून तातडीने व्हेंटिलेटर मागवून घेता येऊ शकतील, असा पर्यायही डॉ. भोंडवे यांनी सुचवला आहे.