पुणे जिल्ह्य़ातील तीन ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरी घेण्यात येईल. सकाळी नऊ वाजता पुण्यातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही सराव फेरी होणार आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्य़ात तीन ठिकाणी प्रत्येकी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना या चाचणीत सहभागी करून घेतले जाणार आहे. या ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कोरोना लसीकरणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.
सकाळी नऊ वाजता संबंधित कर्मचाऱ्यांची लसीकरणाआधी आरोग्य तपासणी होईल, त्यानंतर तयार करण्यात आलेल्या अॅपवर नाव नोंदणी केली जाईल. चाचणी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. या सर्व प्रक्रियेला किती वेळ लागतो, काय-काय अडचणी येऊ शकतात याबाबतचा आढावादेखील घेण्यात येणार आहे. तिन्ही केंद्रांत आरोग्य विभागाचे प्रत्येकी पाच अधिकारी उपस्थित असतील, असेही पाटील यांनी सांगितले.
जालनामध्ये लसीकरण कक्षात वीज, इंटरनेटची सुविधा, प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष अशी व्यवस्था आहे. त्यात काही त्रुटी आहेत काय याची चाचपणी करण्यासाठी जिल्ह्य़ात तीन ठिकाणी प्रत्येकी २५ आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना या रंगीत तालमीमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.
जालना जिल्हा शासकीय रुग्णालय, अंबड येथील उपजिल्हा रुग्णालय आणि बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रंगीत तालीम होईल. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाच कर्मचाऱ्यांचे पथक असलेल्या पथकात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस आदींचा समावेश असेल.
नागपूर जिल्ह्य़ात तीन ठिकाणी लसीकरणासाठी सराव फेरी होणार आहे. त्याकरिता महापालिका व जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने तयारी करण्यात आली आहे. एका केद्रात २५ असे ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या संदर्भात माहिती दिली.
नागपुरात डागा हॉस्पिटल, सिव्हिल लाइन येथील के. टी. नगर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागात कामठी येथील प्राथमिक रुग्णालयात सराव फेरी होणार आहे. प्रत्येक केंद्रावर चार अधिकारी तैनात असतील. प्रारंभी करोना अॅपमध्ये नोंद केली जाईल. त्यानंतर लसीकरणाचा सराव होईल व रुग्णाला ३० मिनिटे त्याच ठिकाणी एका खोलीत विश्रांती घ्यायला सांगितली जाईल. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही सराव फेरी होणार आहे.
नंदुरबारमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सराव फेरी पार पडणार आहे. शासनाच्या संकेतस्थळावरून लसीकरणाबाबत संदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक केंद्रावर २५ अशा एकूण ७५ जणांवर सराव चाचणी घेतली जाणार आहे. या केंद्रांसमोर स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.