कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत. 93 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून 95 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजतागायत आलेल्या 458 विमानांमधील 55 हजार 785 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार विविध 12 देशांतील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर केली जात आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजतागायत राज्यात बाधित भागातून 312 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 228 प्रवाशांचा 14 दिवसांसाठीचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
शांघाय, थायलंड येथून पुण्यात आलेल्या दोन महिला प्रवासी आणि एका तरुणाला कोरोनाच्या संशयावरून महापालिकेच्या नायडू रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.