राज्यात आज कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.