राज्यात कोरोनामुळे पोलिसांवरचा ताण वाढल्याने आता त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला पाचारण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडे तशी मागणी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनामुळे पोलीस अहोरात्र काम करत आहेत. त्यातच रमझानही येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची आहे. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या म्हणजे दोन हजार जवानांना राज्यात तैनात करावे अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनाच कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत आठ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्युही झाला आहे. त्यामुळे थकलेल्या पोलिसांना विश्रांतीचीही गरज आहे. म्हणूनच पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रातील निमलष्करी दलाला पाचारण करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.