राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी हजाराच्या जवळपास आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. राज्यात शुक्रवारी 902 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 95 लाख 929 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के इतके आहे.
दिवसभरात 12 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 329 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 6 हजार 903 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 74 लाख 41 हजार 806 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 47 लाख 840 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 79 हजार 556 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 886 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनच्या 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे. आढळलेल्या रुग्णापैकी सहा रुग्ण पुण्यातील आहेत. तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येकी एक-एक रुग्णाचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 109 वर पोहचली आहे.