Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध - आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध - आरोग्यमंत्री राजेश टोपे
, शुक्रवार, 27 मार्च 2020 (09:47 IST)
कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. 
 
कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी केली. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते. 
 
महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आणि आरोग्य विभागाच्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
 
राज्याच्या एकंदरीत परिस्थितीची माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्राच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जात आहे. राज्यात आतापर्यंत १८ कोरोनाबाधितांना घरी देखील सोडण्यात आले आहे. सध्या कोरोना चाचणी सुविधा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विस्तारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री देखील उपलब्ध आहे, मात्र या ठिकाणी चाचणी सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. ही परवानगी तातडीने द्यावी, जेणेकरून धुळे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर याठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्या करता येतील, असे श्री.टोपे यांनी सांगितले.
 
कोरोना प्रतिबंधासाठी अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन ९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क, पीपीई, व्हेंटीलेटर याची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनसामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू