Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार
, मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (10:29 IST)
कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर 17 ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी  दिली.

जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाउन हा प्रमुख्याने कोविड-19 नियंत्रणासाठी आरोग्य सेवा त्याचप्रमाणे वैद्यकीय
क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊनच लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणाऱ्या यंत्रणांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला होता याचे  चांगले परिणाम दिसून येत आहेत.

लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणजेच येत्या सतरा तारखेपासून टेस्ट टेस्ट आणि ट्रीट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे याच्या अंमलबजावणीत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोविड-19 ही जागतिक आपत्ती आहे. या आपत्तीशी सामना करताना शासन मागे राहिले नाही. मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. हात स्वच्छ धुणे तोंडावर मास्क लावणे त्याचप्रमाणे सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी आपणाला यापुढेही स्वीकाराव्या लागणार आहेत.

लातूर जिल्ह्यात कोविड-19 ला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि शहरांच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा आता करणार आहेत.  जिल्ह्यात तसेच शहरात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

कोविड -19 नियंत्रणासाठी 1 लाख अँटिजन टेस्ट केल्या जातील यासाठी खाजगी लॅबचे ही सहकार्य घेतले जाईल. कोणत्याही व्यक्तीला ही  चाचणी करून घ्यावयाची असल्यास ती सहजपणे करून घेता येईल. कोविड-19 उपचारासाठी आता लातूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी ही पुढाकार घेतला आहे याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोविड -19 चा प्रादुर्भाव इतक्यात संपणार नाही कदाचित यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे हे लक्षात घेतले तर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाबळींचा देशातील आतापर्यंतचा उच्चांक