‘करोना’च्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही. संशयित व्यक्तीच्या घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यामुळं नागरिकांनी रक्त तपासणीबाबतच्या कुठल्याही चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे.
‘करोना’ संशयितांची रक्त तपासणी करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील काही रुग्णालयांच्या नावांची यादी सध्या सोशल मीडियात विशेषत: व्हॉट्सएपवर व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. ‘राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव (‘नसो फॅरिंजीयल स्वॅब’) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या तीन ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा मुंबईतील केईएम रुग्णालय व हाफकीन इन्स्टिट्यूटसह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. त्यामुळं रक्त तपासणीसारख्या संदेशांना भुलू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.